वृत्तसंस्था/ अजमेर
आसाममधील आयएएस अधिकारी सेवाली देवी शर्मासह तिघांना अजमेरमधून अटक करण्यात आली आहे. आसामच्या दक्षता (व्हिजिलन्स) विभाग अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी अजमेरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या मदतीने ही कारवाई केली. आसामच्या स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड टेनिंगमध्ये (एससीईआरटी) 105 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
आसाम व्हिजिलन्सचे विशेष पथक निरीक्षक प्रीतम सेकिया यांच्या नेतृत्वाखालील पथक रविवारी रात्री उशिरा अजमेरला पोहोचले होते. आरोपी अजमेर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. सोमवारी सकाळी आसाम दक्षता पथक आणि कोतवाली पोलिसांनी लोकेशनच्या आधारे सेवाली देवी शर्मा, जावई अजित पाल सिंग आणि राहुल अमीन यांना हॉटेल क्रॉस लेन, जयपूर रोड येथून अटक केली.
आयएएस अधिकारी सेवाली देवी शर्मा 2017-2020 दरम्यान ‘एनसीईआरटी’मध्ये सेवा बजावत होत्या. त्यांच्यावर 100 कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप आहे. त्यांनी सरकारच्या संमतीशिवाय 5 बँक खाती उघडून कोणत्याही वर्क ऑर्डरशिवाय 105 कोटी ऊपये हस्तांतरित केल्याचा संशय आहे. या घोटाळ्यात त्यांच्या जावयाचाही सहभाग असल्याचे बोलले जात असून तो कंत्राटदार आहे. आता सरकार या घोटाळ्याच्या प्रकरणाची कडक चौकशी करत असून विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी हे प्रकरण उघडकीस येताच सरकारने सेवालीदेवी यांना निलंबित केले होते. सेवाली देवी शर्मा या 1992 पॅडरच्या अधिकारी आहेत. त्यांनी बीए आणि एलएलबी केले आहे.









