हारुगेरी पोलिसांची कारवाई : संशयित तिघेही रायबाग तालुक्यातील
वार्ताहर/कुडची
दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी हारुगेरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. रायबाग तालुक्यातील हारुगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. अभिषेक बाळाप्पा बेवनूर (रा. यलपारट्टी ता. रायबाग), अदिलशहा ऊर्फ अप्पू शब्बीर जमादार (रा. हारुगेरी ता. रायबाग) व कौतुक ऊर्फ बाबसू बानू बडिगेर (रा. अलकनूर ता. रायबाग) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. गुळेद पुढे म्हणाले, इन्स्टाग्रामवर मेसेजला प्रतिसाद देत एका अल्पवयीन मुलीची अभिषेक याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर मेसेजवरून त्यांचा संपर्क वाढत गेला. दरम्यान, अभिषेकने सदर युवतीला अथणी तालुक्यातील कोकटनूर यात्रेत येऊन भेटण्याची गळ घातली. तेथे भेट घेऊन विश्वास संपादन करून अभिषेकने 17 वर्षाच्या मुलीशी मोबाईलवरून संपर्क वाढविला. त्यानंतर 3 जानेवारी रोजी सौंदत्ती यल्लम्माला जाऊन परत येऊया, असे सांगून तिला तयार केले.
हारुगेरी येथे मित्रांसह तो एक कार घेऊन आला असता सदर मुलीने आपल्या अन्य एका अल्पवयीन मैत्रिणीला सोबत घेतले होते. या कारचा चालक म्हणून कौतुक बडिगेर हासुद्धा सोबत होता. सौंदत्तीला जाऊन येऊया असे सांगून हारुगेरीतून दोन्ही मुलींना घेऊन ते निघाले. रायबाग तालुक्यात काही अंतर गेल्यावर संसुद्दी येथे दुपारी 2 वा. डोंगरावर गाडी थांबवून निर्जनस्थळी नेऊन मैत्री केलेल्या युवतीवर अभिषेकसह अदिलशहाने अत्याचार केले. या अत्याचाराचे व्हिडिओ शुटिंग करून घेतले. तर मोटारीत बसलेल्या दुसऱ्या मैत्रिणीवरही चालकाने अत्याचार केले. या सर्व प्रकारानंतर त्यांना गावापर्यंत पोहोचविण्यात आले.
त्यानंतर पुन्हा संबंधित अल्पवयीन युवतीला आपल्यासोबत पुढील आठवड्यात गोव्याला यावे लागेल, अन्यथा सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर सदर मुलींनी हारुगेरी पोलीस ठाण्यात जाऊन 13 रोजी याबाबत फिर्याद दिली होती. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ तिघांनाही अटक करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख करून मुलींना फुस लावून सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा हादरला आहे. दोन्ही मुली अल्पवयीन असून त्यांच्यावर तिघा नराधमांनी अत्याचार केला आहे. या घटनेनंतर हारुगेरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयितांना पकडले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रुती, आर. बी. बसरगी, अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर, उपनिरीक्षक माळाप्पा पुजारी, कर्मचारी बी. एस. होसट्टी, रमेश मुंदीनमनी, ए. एस. शांडगे, एच. आर. आंबी, पी. एस. सप्तसागर, एस. ए. हुगार, तांत्रिक सेलचे विनोद ठक्कनावर यांनी ही कारवाई केली.









