बसवन कुडची येथील प्रकाराने शेतकऱयांत भीती : पशु संगोपन खात्याकडून रोग नियंत्रणासाठी शर्थीचे प्रयत्न

वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागांमध्ये जनावरांना लम्पिस्किनची (त्वचारोग) लागण झपाटय़ाने होत असून गेल्या चार दिवसांमध्ये बसवन कुडची येथील तीन जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण असून पशु संगोपन खात्याच्या वतीने रोग नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तरी पशुपालकांनी जनावरांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्वभागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, मुतगा या गावांमध्ये या रोगाची लागण जास्त झाल्याचे आढळून आले आहे. शनिवार दि. 3 रोजी बसवन कुडची येथील तानाजी गल्लीतील शेतकरी नामदेव मुतगेकर यांचा बैल तर रविवार दि. 4 रोजी मेन रोडवरील शेतकरी सचिन खोकलेकर यांचा बैल लम्पिस्किन रोगाने दगावला आहे. तर चार दिवसांपूर्वीच तानाजी गल्लीतील शेतकरी राजू पाटील यांची गाय या रोगाने दगावली आहे. गावांमध्ये सध्या अनेक जनावरांना या रोगाची लागण झालेली आहे.
त्यामुळे शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पशु संगोपन खात्याच्या रॅपिड ऍक्शन पथकाद्वारे जनावरांवर उपचार करण्यात येत आहेत. सध्या या रोगाची लागण झालेल्या जनावरांची सध्या संख्या अधिक आहे. पशु संगोपनतर्फे सध्या हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या शरीरावर गाठी येऊन आजारी पडत आहेत. पशु संगोपन खात्याचे सहाय्यक संचालक डॉ. आनंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रॅपिड ऍक्शन पथक लागण झालेल्या जनावरांवर उपचार करत आहेत. या रोगावर अद्याप औषध उपलब्ध झाले नसल्याने जनावरे दगावत आहेत. त्यामुळे संबंधित पशुपालकांनी खबरदारी घ्यावी व ज्या जनावरांना या रोगाची लागण झाली आहे,अशा पशुपालकांनी पशु संगोपन खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदारांची भेट
बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी रविवारी बसवण कुडची गावाला भेट देऊन जनावरे दगावलेल्या शेतकऱयांची भेट घेतली व शासन दरबारी प्रयत्न करून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी नगरसेवक बसवराज मोदगेकर, परशराम बेडका, संतोष चौगुले, नामदेव मुतगेकर, वसंत बेडका, किरण बेडका, मल्लाप्पा मोदगेकर व इतर शेतकरी उपस्थित होते.









