ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या हडपसर परिसरात एका संशयित कारमधून साडेतीन कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस आणि हडपसर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. याप्रकरणी प्रशांत धनपाल गांधी (वय 47, रा. लासूरणे, ता. इंदापूर, जि. पुणे) या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून मोठय़ा प्रमाणावर रोकड घेऊन जात असल्याची माहिती लोणी काळभोर वाहतूक शाखा आणि हडपसर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हडपसर परिसरात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास संशयित कार (एमएच 13 सीके 2111) पोलिसांनी थांबवली. कारची तपासणी केली असता कारमध्ये काही बॅगा आढळल्या. बॅगा उघडल्यावर मोठय़ा प्रमाणात रोकड आढळून आली. पोलिसांनी संशयित कार ताब्यात घेऊन संबंधित व्यक्तीला हडपसर पोलीस ठाण्यात आणले.
बॅगांमधील रोकड मोजली असता 3 कोटी 42 लाख 66 हजार एवढी होती. ही रोकड सीलबंद करुन पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला पुढील कारवाईबाबत कळवले आहे. संबंधित कारचालकाने ही रोकड लक्ष्मी रोड येथील महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेत कर्जापोटी भरण्यासाठी आणल्याचे पोलिसांना सांगितले आहे.









