दहशतीत अमेरिकेचे न्यायाधीश : मस्क यांच्यावर होतोय आरोप
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे न्यायाधीशांच्या विरोधात कठोर कारवाईची धमकी देत होते. आता ट्रम्प हे अध्यŠ झाल्यावर त्यांच्या आदेशांच्या विरोधात निर्णय देणाऱ्या अमेरिकेच्या न्यायाधीशांना स्वत:च्या सुरक्षेची चिंता सतावू लागली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांना आव्हान देणाऱ्या उच्चस्तरीय प्रकरणांची देखरेख करणाऱ्यांच्या विरोधात ऑनलाइन धमक्या मिळत आहेत.
ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशांच्या विरोधात सुनावणी करणारे न्यायाधीश आणि इलॉन मस्क यांच्या डीओजीईच्या आदेशानंतर नोकरीतून हटविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांशी निगडित प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या संघीय न्यायाधीशांच्या विरोधात सोशल मीडियावर धमक्यांचा महापूर आला आहे. अलिकडेच ट्रम्प यांनी एका संघीय न्यायाधीशाच्या विरोधात महाभियोगाची मागणी केली, या न्यायाधीशाने ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात निर्णय दिला होता. यानंतर सोशल मीडियावर न्यायाधीशांना मोठ्या प्रमाणात धमक्या मिळत आहेत.
संघीय न्यायाधीशांवर महाभियोग चालविण्याचे समर्थन करणाऱ्या रिपब्लिकन खासदारांना मस्क यांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे. एरिझोनाचे एली क्रेन, कोलोराडोच्या लॉरने बोएबर्ट, टेनेसीचे एंडी ओगल्स, जॉर्जियाचे एंड्य्रू क्लाइड, विस्कॉन्सिनचे डेरिक वॅन ऑर्डेन आणि टेक्सासचे ब्रँडन गिल यांना मस्क यांच्याकडून मोठी देणगी मिळाली आहे. मस्क यांनी आयोवाचे सिनेटर चार्ल्स ई. ग्रास्ली यांनाही आर्थिक योगदान दिले आहे. मस्क यांनी न्यायाधीशांवर महाभियोगाचे समर्थन केले आहे.
निनावी कॉलद्वारे न्यायाधीशांना धमकी
न्यायाधीशांना बॉम्बची धमकी, घराच्या पत्त्यावर पोलिसांच्या स्वॅट टीम्सना पाठविण्यासाठी निनावी कॉल, पिझ्झाच्या डिलिव्हरीद्वारे न्यायाधीशांना धमकी मिळत आहे. न्यायाधीशांचे कुटुंब कुठे राहते हे धमकी देणाऱ्यांना ठाऊक आहे, यामुळे हिंसेची शक्यता वाढत असल्याचे एका न्यायाधीशाने म्हटले आहे. लोक आमच्या जीवनासोबत रशियासारखा खेळ खेळत असल्याची टिप्पणी अमेरिकेतील न्यायाधीश एस्तेर सालास यांनी म्हटले आहे. एस्तेर यांच्या 20 वर्षीय मुलाची एका वकिलाने गोळ्या झाडून हत्या केली होती. चार्ल्सटनमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश कोनी बॅरेट यांना मेलबॉक्समध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे.









