ऑनलाईन टीम / तरुण भारत :
रशियाहून गोव्यासाठी उड्डाण केलेल्या अझूर एअरलाईन्सच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची देण्याची धमकी देण्यात आली होती. रशियाच्या पेराम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने गोव्यासाठी उड्डाण केले होते. धमकीनंतर वैमानिकाला सुरक्षेचा अलर्ट देण्यात आला. त्यानंतर घाईगडबडीत हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले.
अझूर एअरलाईन्सच्या या विमानाने रशियाच्या पेराम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोव्यासाठी उड्डाण केले होते. आज पहाटे 4.15 वाजता हे विमान गोव्यातील डाबोलिम विमानतळावर उतरणार होते. मात्र, डाबोलिम विमानतळ संचालकांना रात्री 12.30 वाजता विमानात बॉम्ब ठेवला असल्याचा ईमेल मिळाला. त्यानंतर वैमानिकाला सुरक्षेचा इशारा देण्यात आला. या विमानात 7 क्रू मेंबर्ससह 240 प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती आहे. त्यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव वैमानिकाने गोव्याकडे निघालेले हे विमान उझबेकिस्तानकडे वळवले.
दरम्यान, अझूर एअरलाईन्सच्या विमानासोबत 9 जानेवारीला अशीच घटना घडली होती. मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती गोव्याच्या एअर ट्रफिक कंट्रोलला ई-मेलद्वारे मिळाली होती. त्यानुसार गुजरातमधील जामनगर येथे या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.









