कोल्हापूर :
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह गतवर्षी 9 ऑगस्टला लागलेल्या आगीत बेचिराख झाले. याची नव्याने व जसेच्यातसे उभरणी करण्यासाठी तत्काळ राज्य शासनाने 25 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, शेजारी असणाऱ्या राजर्षी शाहू खासबाग मैदानाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जिल्हा व शहर नागरी कृती समितीच्यावतीने करण्यात आला आहे.
मिरजकर तिकटी मार्गाच्या बाजूला असणाऱ्या खासबाग मैदानाच्या तटबंदीतील दगडांमध्ये पाईपलाईनच्या गळतीतून पाणी झिरपत असुन याचे दग कमकुवत होत आहेत. याबाबत प्रशासनाला निवेदन देवूनही दुर्लक्ष केले जात असुन प्रशासनाने तत्काळ यावर उपाययोजना केल्या नाही तर आंदोलनाचा छेडण्यात येईल, असा इशारा कृती समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाला लागलेल्या आगीत ऐतिहासिक राजर्षि शाहू खासबाग कुस्ती मैदानाचे व्यासपीठही जळाले. आगीत मैदानाच्या व्यासपीठाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. राजर्षी शाहूंचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होतोय की काय अशी परिस्थिती झाली होती. राज्य शासनाने या वास्तू पुनर्बांधणीसाठी तातडीने कोट्यावधीचा निधी दिला पण नाट्यागृहा बरोबर कुस्ती मैदानाची ही दुरुस्ती चालू व्हायला पाहिजे, अशी मागणी जिल्हा व शहर नागरी कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
दीड वर्षापूर्वी केशवराव भोसले नाट्यागृहासमोरील स्वच्छतागृहावर खासबाग मैदानाच्या तटबंदीची भिंत कोसळ्याने एका महिलेचा जीव गेला. या घटनेला दीड वर्षाचा कालावधी लोटला असला तरी अजुनही भिंतीचे काम अपुर्णच आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. नाट्यागृह आणि मैदानासाठी शासनाकडून कोट्यावधीचा निधी आला आहे. त्यामुळे यातून टक्केवारी मिळवण्यासाठी संबंधितांच्या तोंडाला पाणी सुटले आहे की काय अशी शंका येत असल्याचे कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

मिरजकर तिकटी दूध कट्ट्याकडून प्रायव्हेट हायस्कूल कडे जाणाऱ्या रस्त्यावरील बाजूला कुस्ती मैदानाच्या तटबंदीला लागून आतमध्ये दोन इंची पाईप गेली आहे. या पाईपमधून दिवसभर पाणीपुरवठा केला जातो. या पाईमधुन दिवसभर पाणी वाहत आहे. हे पाणी मैदानाच्या तटबंदीला लागून वाहत असल्यामुळे संपूर्ण तटबंदीमध्ये पाणी पाझरून त्याच्या दगडातून पाण्याचे लोट वाहत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तटबंदी कोसळली की आणखी निधी आणता येईल व त्यातून आपल्याला टक्केवारी मिळवता येईल असा महापालिकेचा डाव असण्याची शक्यता असल्याचा आरोप कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या अशोक पोवार, रमेश मोरे यांनी केला आला आहे.
कृती समितीच्यावतीने खासबाग मैधनाची पाहणी करण्यात आली. या प्रकाराबाबत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी एस. एन. जोशी, विनायक तहसीलदार, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमते, सदानंद सुर्वे, प्रकाश चुयेकर, महादेव जाधव, बाबा वाघापूरकर, कॉ. राजेश वरक, लहुजी शिंदे, इंजिनीयर महेश जाधव, प्रसाद बुलबुले, राजाराम कांबळे आदी उपस्थित होते.








