ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला विदेशातून यासंदर्भात ईमेल आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाला ‘मोखीम’ नावाने ईमेल आला आहे. या मेलमध्ये “मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असून विशिष्ट धर्माच्या लोकांना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देण्याच्या धमकीसह देशभरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकीही या ईमेलमध्ये देण्यात आली आहे.
या सगळ्या प्रकारानंतर रुग्णालयाच्या वतीने पुणे शहर पोलिसांना यासंदर्भात कळविण्यात आले. त्यानंतर अलंकार पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.









