मंदिर व्यवस्थापनाला पत्राद्वारे अलर्ट
वृत्तसंस्था/ गया
झारखंडच्या वासेपूरचा कुख्यात गुन्हेगार प्रिन्स खान पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी त्यांनी बिहारमधील बोधगया येथे असलेले महाबोधी मंदिर उडवून देण्याची धमकी दिली आहे. मंदिर व्यवस्थापनाला पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर पाटणा, दिल्ली आणि रांची पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. प्रिन्स खान 2021 पासून फरार असून तो दुबईत लपून बसल्याचे बोलले जात आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने पत्रात आयएसआयचे नावही घेतले आहे. पत्रात प्रिन्स खानचे नाव असल्याने पोलिसांचे लक्ष त्याच्याकडे लागले आहे. गया पोलिसांनी धनबाद गाठून वासेपूर येथील प्रिन्स खानच्या घराची झडती घेतली. ही धमकी खरी आहे की कोणीतरी बदनामी केली आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यापूर्वी प्रिन्स खान धनबाद आणि बोकारोच्या व्यावसायिकांना धमकावून खंडणीची मागणी करायचा. परंतु, कोणत्याही धार्मिक स्थळाला लक्ष्य करण्यात आले नाही. आत या नव्या धमकी प्रकरणात प्रिन्स खानचा हेतू काय याचा तपास पोलीस करत आहेत.









