थेट उपमहानिरीक्षकांनाच तीनवेळा धमकीचा कॉल : ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर
बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृह बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञातांनी दिली आहे. कारागृह विभागाचे बेळगाव उत्तर विभाग उपमहानिरीक्षक टी. पी. शेष यांच्याशी संपर्क साधून अज्ञाताने ही धमकी दिली असून यासंबंधी सोमवारी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. टी. पी. शेष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि 506, 507 कलमान्वये अज्ञाताविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. बॉम्बच्या धमकीने एकच खळबळ माजली आहे. रविवार दि. 8 ऑक्टोबर रोजी 4.15 पासून सतत तीनवेळा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कारागृह उपमहानिरीक्षकांशी संपर्क साधून आपण हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी जगदीश गस्ती व एस. एम. गोटे यांच्याशी परिचित असल्याचे सांगत बेंगळूर व हिंडलगा कारागृह आणि निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याबरोबरच हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात दंगल घडविण्याबरोबरच तुमच्यावरही हल्ला करण्याची धमकी शेष यांना देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाला फोन करून खंडणीसाठी याच कारागृहातील एका कैद्याने धमकावले होते.









