वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानमधील 100 हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेल रविवारी सकाळी आल्याने राज्यभर खळबळ उडाली. हॉस्पिटलमध्ये बॉम्ब पेरण्यात आले असून सर्वांना मारले जाईल, असे मेलमध्ये लिहिले होते. जयपूरचे मोनिलेक आणि सीके बिर्ला हॉस्पिटल आणि इतर संस्था या धोक्याचे केंद्र होते. या धमकीनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई सुरू केली. सकाळी साडेआठच्या सुमारास मोनिलेक हॉस्पिटल आणि सीके बिर्ला हॉस्पिटलमध्ये शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान दोन्ही रुग्णालयांमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. झडतीदरम्यान एटीएस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक दोन्ही रुग्णालयात पोहोचले होते. धमकीचे ई-मेल पाठवणाऱ्याचा आयपी अॅडेस तपासला जात आहे, मात्र अद्याप कोणताही ठोस सुगावा मिळालेला नाही. गेल्या तीन महिन्यांत शाळा आणि विमानतळांनाही अशाच प्रकारच्या धमक्मया पाठवण्यात आल्या आहेत, त्या सर्व खोट्या असल्याची पुष्टी झाली आहे.









