चंदिगढ, मोहाली निशाण्यावर ः पाकिस्तानी संघटनांचा कट
चंदिगढ / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहाली दौऱयापूर्वी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय चंदिगढ आणि मोहालीमध्ये हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला प्राप्त झाली आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना या दोन्ही बसस्थानकांना किंवा अन्य गर्दीच्या ठिकाणांवर स्फोट घडवू शकतात, असा इशारा गुप्तचर विभागाने दिल्यानंतर सुरक्षा आणि तपासात वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी संभाव्य दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पंजाब सरकारला माहिती पाठवली आहे. यानंतर पंजाब पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत नियोजन सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 ऑगस्टला मोहालीत येत आहेत. येथे ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन करतील. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या यापूर्वीच्या पंजाब दौऱयावेळी सुरक्षा व्यवस्था आणि सज्जतेमध्ये मोठी त्रुटी आढळून आल्यामुळे आताच्या दौऱयात संपूर्ण सुरक्षाव्यवस्था कडेकोट ठेवण्यावर सुरक्षा अधिकाऱयांनी भर दिला आहे.
काही दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांनी दिल्लीतून 4 दहशतवाद्यांना पकडले होते. यामध्ये दीपक मोगा, सनी इसापूर, संदीप सिंग आणि विपिन जाखर यांचा समावेश होता. त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले असून त्यांच्याकडून दहशतवादाशी संबंधित धागेदोरे तपासण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून सुरू आहे. त्यांच्या चौकशीदरम्यान दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेल्या ठिकाणांची माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच टार्गेट किलिंगची माहिती पोलिसांना मिळाली. पंजाब पोलिसांनी याला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचा पाठिंबा असलेले दहशतवादी मॉडय़ूल म्हटले होते.
10 नेते-अधिकाऱयांच्या सुरक्षेत वाढ
पंजाबमध्ये नेते आणि अधिकारीही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यात माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधावा, माजी मंत्री गुरकीरत कोटली, विजयेंद्र सिंगला आणि परमिंदर पिंकी यांची प्रमुख नावे आहेत. केंद्रीय गुप्तचर संस्थेने पंजाब पोलिसांना 10 जणांची यादी पाठवली होती. त्यानंतर या सर्वांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.









