वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंतसिंग पन्नू याने भारतात हमाससारखे हल्ले केले जातील अशी धमकी दिली आहे. त्याने मंगळवारी एक व्हिडीओ प्रसारित करुन त्याद्वारे ही धमकी दिली. पन्नू हा अमेरिकेत वास्तव्य करीत असून तो शिख्स फॉर जस्टीस या संघटनेचा हस्तक आहे. तो अनेक गुन्ह्यांसाठी भारताला हवा आहे.
भारताने पंजाबवर कब्जा केला आहे. पंजाबच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही लढत आहोत. आमचा मतांवर आणि लोकशाहीवर विश्वास आहे. भारताने शीखांवर अन्याय चालविला असून पंजाबमध्ये स्वतंत्र शीख शासन निर्माण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. भारताने पंजाबवरचा आपला ताबा सोडला नाही तर जी परिस्थिती निर्माण होईल तिला भारताचे सरकार जबाबदार असेल. मतदान किंवा बंदुकीच्या गोळ्या यापैकी एकाची निवड भारताने करावी. भारतावर हल्ला करण्याची आमची तयारी आहे, अशी दर्पोक्ती त्याने केली आहे.
एआयआर सादर
येत्या शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामना होत आहे. हा सामना उधळून लावण्याची धमकी याच पन्नूने काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात एफआयआर सादर करण्यात आला असून तो पोलिसांना अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली हवा आहे. तो अमेरिकेत वास्तव्य करीत असल्याने भारताने त्या देशाकडे त्याच्यासंबंधी चौकशी करण्याचा आग्रह धरला आहे.









