संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत राजदूत कंबोज यांचे प्रतिपादन
संयुक्त राष्ट्रसंघ / वृत्तसंस्था
भारताला सीमेपलिकडून ड्रोनच्या माध्यमातून बेकायदा शस्त्रतस्करीचा मोठा धोका आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी राजदूत रुचिरा कंबोज यांनी केला आहे. त्या सोमवारी येथे ‘आंतराष्ट्रीय शांततेला धोका ः बेकायदेशी शस्त्र तस्करी’ या विषयावरील खुल्या चर्चेत बोलत होत्या. ही चर्चा रशियाच्या अध्यक्षतेत झाली. कंबोज यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका केली.
ड्रोनच्या साहाय्याने भारतात घातक शस्त्रे सीमेपलिकडच्या देशातून पाठविण्यात येत आहेत. सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग करुन ही शस्त्रतस्करी सुरु आहे. याकडे आंतरराष्ट्रीय समुदाय दुर्लक्ष करु शकत नाही. अशा शस्त्रतस्करीमुळे भारतीय उपखंडात नवे तणाव निर्माण होत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका
अण्वस्त्रप्रसार करणारे काही देश, ज्यांची विश्वासार्हता संशयास्पद आहे, ते अशा बेकायदेशीर कामांमध्ये गुंतले आहेत. त्यांनी दहशतवाद्यांशी संधान बांधले असून त्यांच्या माध्यमातून ही शस्त्रतस्करी करुन भारतातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न हे देश करीत आहेत. अशा देशांना अशा बेकायदेशीर कृत्यांसाठी जबाबदार धरण्यात आले पाहिजे. जेव्हा दहशतवादी आणि समाजविरोधी शक्तींना काही देशांच्या प्रशासनाचा पाठिंबा मिळतो तेव्हा अशा बेकायदेशीर कृत्यांचे प्रमाण अनेक पटींनी वाढते. सध्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या गटांना मिळणाऱया लहान शस्त्रांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. हे अशा दहशतवाद्यांना सीमेपलिकडच्या देशांच्या प्रशासनाच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने अशा देशांना धडा शिकविण्याची आवश्यकता आहे. या धोक्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरेल, अशी मांडणी त्यांनी केली.
भारतात शस्त्रतस्करी
पाकिस्तानकडून भारतात मोठय़ा प्रमाणावर शस्त्रतस्करी चालत आहे. यासाठी ड्रोनचा उपयोग करण्यात येत आहे. अशी काही ड्रोन्स गेल्या काही महिन्यांमध्ये भारताच्या सीमा सुरक्षा दलाने पाडली आहेत. तथापि, ड्रोन्सच्या साहाय्याने भारताच्या वायुसीमेचा भंग करण्याचे प्रमाण वाढत आहे. ही शस्त्रे भारतातील दहशतवादी गटांना पाठविण्यात येत आहेत. ती त्यांच्या हाती पडू नयेत, यासाठी भारतीय पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत.
आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन
कंबोज यांनी याच मुद्दय़ाचा उल्लेख सुरक्षा परिषदेत बोलताना केला. हा धोका केवळ एका देशाला आहे म्हणून इतरांनी स्वस्थ बसू नये. कारण आज एका देशाला असणारा धोका उद्या साऱया जगाची समस्या बनू शकतो, अशा अर्थाचे वक्तव्य त्यांनी केले. असे प्रकार करणाऱया देशांविरोधात एकत्र दबाव आणणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी सुरक्षा परिषदेत केले.









