जर्मनीतील उत्खननादरम्यान यश
जर्मनीच्या पुरातत्वतज्ञांनी म्युनिच येथील एका बांधकामस्थळाच्या तपासणीदरम्यान एक विशेष प्रकारच्या प्राचीन कात्रीचा शोध लावला आहे. ही कात्री अत्ंयत उत्तमप्रकारे संरक्षित असून याची धार अद्याप कायम आहे.
एक बॉम्बविरोधी पथक म्युनिच शहरातील सेंडलिंगमध्ये एका बांधकामस्थळी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील स्फोट न झालेल्या दारूगोळ्याचा शोध घेत होते. जर्मनीत अशाप्रकारची तपासणी सामान्य मानली जाते. शोध घेताना त्यांना एक लाकडी बॉक्स आढळून आला. हा बॉक्स थडग्याच्या मकबऱ्यासारखा दिसत होता. यामुळे पथकाने स्मारकांचे संरक्षण करणाऱ्या बवेरियन स्टेट ऑफिसच्या पुरातत्वतज्ञांना पाचारण केले. हा बॉक्स ख्रिस्तपूर्व दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातील होता. त्या काळात सेल्ट लोक मृत लोकांचे अवशेष आणि त्यांच्या गोष्टी दफन करण्यापूर्वी मृतदेहांवर अग्निसंस्कार करायचे.

सेल्ट्स प्रारंभी इंडो-युरोपियन लोक होते, जे बहुतांशकरून पश्चिम युरोपमध्ये फैलावलेले होते. या लोकांमध्ये अनेक समुदाय अन् समूह होते. हे लोक ब्रिटिश बेटांपासून उत्तर स्पेनपर्यंत फैलावलेले होते.
सेल्ट लोक मृत्यूनंतरच्या जीवनाला अत्यंत मानत होते आणि हाच विचार त्यांच्या दफन करण्याच्या प्रथांमध्ये दिसत होती. परंतु या प्रथांबद्दल लेखी स्वरुपात काहीच पुरावा नाही. याचमुळे त्यांच्या प्रथांबद्दल केवळ त्यांनी सोडलेल्या सामग्रीद्वारेच कळू शकते.

बीएलएफडीच्या पथकाला संबंधित ठिकाणी एक वाकलेली तलवार, एका ढालीचे अवशेष, एका भाल्याचे टोक आणि मानवी पायाचे हाड इत्यादी सामग्री सापडली आहे. तलवार वाकविण्यापूर्वी ती गरम करण्यात आली असावी असे संशोधकांचे मानणे आहे. लुटींनी थडग्याचे नुकसान करून नये म्हणून त्यांना हतोत्साहित करण्यासाठी तलवार वाकविण्यात आल्याचे मानले जाते. तलवारीचे स्वरुप बिघडविणे एखाद्या गोष्टीचे प्रतीक देखील असू शकते. परंतु या सर्व सामग्रींमध्ये सर्वाधिक लक्ष कात्रीने वेधून घेतले आहे.
ही कात्री अत्यंत संरक्षित स्थिती असल्याने संशोधक अवाक् झाले आहेत. कात्रीची चमक आजही दिसुन येत आहे. प्राचीन कात्री कशाप्रकारे उपयोगी पडत होती यावर आता संशोधन करण्यात येत आहे. बीएलएफडीचे प्राध्यापक मॅथियास फिल या शोधाला विशेष मानत आहेत. ही कात्री प्रभावशाली शिल्पकौशल्याचा नमुना असण्यासह तिला संरक्षित करण्याची पद्धतही कमाल आहे. कात्री सुमारे 2300 वर्षे जूनी असून तिचा आजही वापर करणे शक्य असल्याचे प्राध्यापक फिल यांनी म्हटले आहे.









