क्रोएशियात लागला शोध
समुद्रात 16 फूट इतक्या खोलवर 7 हजार वर्षे जुन्या रस्त्याचा शोध लागला आहे. म्हणजेच इतक्या वर्षांमध्ये समुद्राची पातळी 16 फुटांपर्यंत वाढली आहे. हा रस्त दक्षिण क्रोएशियाच्या किनाऱ्यानजीक भूमध्य सागरात आढळून आला आहे. हा रस्ता प्राचीन शहर सोलिनमध्ये तयार करण्यात आला होता असे सांगण्यात आहे. सोलिन हे शहर ह्वार संस्कृतीच्या काळातील असून तेथून लोक कोरकुला नावाच्या बेटावर जायचे.
सोलिन शहराचा शोध 2021 मध्ये क्रोएशिया येथील जडार विद्यापीठाच्या पुरातत्व तज्ञ मेट पॅरिसा यांनी लावला होता. तेव्हापासून पाणबुडे सातत्याने या ठिकाणी नवनव्या गोष्टींचा शोध घेत आहेत. कोरकुला बेटाची उपग्रहीय छायाचित्रे घेण्यात आली असून याद्वारे हे ठिकाण कशाप्रकारे मुख्य भूमीशी जोडले गेले होते हे स्पष्ट होते. उपग्रहीय छायाचित्रांचे अध्ययन केल्यावर समुद्राच्या आत एक शहर होते असे दिसून आले. यानंतर मॅट पॅरिसा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला होता.

भूमध्यसमुद्राच्या पृष्ठभागापासून 16 फूट खोलवर त्यांना दगडी भिंत आढळून आली, जी अत्यंत प्राचीन होती. मुख्य बेटापासून एका वेगळ्या हिस्स्यात तयार झालेली ही नागरी वस्ती होती. मेडिटेरिनियनच्या बहुतांश हिस्स्यांमध्ये तीव्रतेच्या लाटा उसळत असतात, परंतु येथे असे घडत नाही, याचमुळे हे ठिकाण शिल्लक राहिल्याचे मॅट यांनी सांगितले आहे.
आढळून आलेला प्राचीन रस्ता बऱ्याचअंशी सुस्थितीत आहे. हा रस्ता सुमारे 13 फूट रुंदीचा असून तो दगडांना जोडून तयार करण्यात आला होता. सध्या या रस्त्यावर माती अन् चिखलाचा मोठा थर जमा झाला आहे. परंतु पाण्यातील याचे स्वरुप दिसून येते. पूर्वी येथे समुद्र राहिला नसावा, परंतु ते समुद्रात बुडाले असावे.
येथील लाकूड तसेच अन्य सामग्रींचे रेडिओकार्बन विश्लेषण करविण्यात आले असता ती ख्रिस्तपूर्व 4 हजार वर्षांची असावी असे आढळून आले. या रस्त्याचा शोध घेण्यासाठी अनेक पाणबुड्यांची मदत घ्यावी लागली होती. कोरकुलामध्ये आणखी एक ठिकाण मिळाले असून ते या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आहे. तेथे समुद्राच्या आत दगडी कलाकृती आढळून आल्या आहेत. यात नियोलिथिक कलाकृतींचा समोश आहे. नियोलिथिक कालखंड सुमारे 12 हजार वर्षांपूर्वी होता आणि याला पाषाणयुग देखील म्हटले जाते.









