वैज्ञानिकांना बसला आश्चर्याचा धक्का
मानवतेच्या इतिहासाविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक आणि पुरातत्व तज्ञ सातत्याने करत असतात. परंतु सर्वकाही जाणून घेणे त्यांना शक्य होत नसते. परंतु वैज्ञानिकांना काहीवेळा अशा गोष्टी हाती लागतात, ज्यामुळे इतिहासाबद्दल बरेच काही ज्ञान मिळते. जेरूसलेम येथे अलिकडे असेच घडले आहे. तेथे अचानक 2000 वर्षे जुने नाणे मिळाले आहे.
जेरूसलेमच्या पुरातात्विक पार्कमध्ये एक अत्यंत दुर्लभ आणि ऐतिहासिक शोध लागला आहे. येथे ज्यू बंडखोरांकडून 2000 वर्षांपूर्वी दुसऱ्या मंदिराच्या विनाशापूर्वी तयार करण्यात आलेले एक कांस्याचे नाणे मिळाले आहे. या शोधाची घोषणा इस्रायल एंटीक्विटीज अथॉरिटीने केले आहे. तिशा बी आव या ज्यू शोकदिनापूर्वी ही घोषणा करण्यात आली. याच दिवशी रोमन्सकडून जेरूसलेमचे मंदिर नष्ट करण्यात आले होते. नाणे मंदिर पर्वताच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यानजीक जुन्या शहरात मिळाले आहे. नाण्याच्या समोरील बाजूवर प्राचीन हिब्रू लिपित ‘सिय्योनच्या मुक्तीसाठी’ लिहिले आहे. हा मजकूर तत्कालीन ज्यूंची स्वातंत्र्य आणि धार्मिक आकांक्षा दर्शवितो. नाण्याच्या मागील हिस्स्यावर लूलवर (खजूराचे पान) आणि दोन एट्रोल (सुक्कोत पर्वादरम्यान वापरण्यात येणारे सायट्रन फळ)ची आकृती आहे. हे नाणे 69 ते 70 सालादम्यान तयार करण्यात आले होते. म्हणजेच हे बंडखोरीचे चौथे वर्ष असावे. या नाण्याची स्थिती अत्यंत चांगली असल्याचे नाणेतज्ञ यानिव डेव्हिड लेवी यांनी सांगितले.
पहिल्या नजरेत हे एक दुर्लभ नाणे असल्याचे वाटले. सफाईनंतर याची खरी आकृती समोर आल्यावर हा बंडखोरीच्या चौथ्याचा वर्षाचा ऐतिहासिक संदेश निघाला असल्याचे पुरातत्व तज्ञ एस्थर राकोव-मेलेट यांनी सांगितले आहे.
अत्यंत दुर्लभ नाणे
तिशा बी आव पूर्वी अशाप्रकारचा शोध अत्यंत प्रतिकात्मक आहे, कारण हा त्या महान विनाशाची साक्ष देतो. चौथ्या वर्षाचे असे नाणे अत्यंत दुर्लभ आहे. कारण बंडखोरीच्या अंतिम टप्प्यात बंडखोरांची उत्पादन क्षमता कमी झाली होती. नाण्याचा संदेश बंडखोरांच्या मानसिकतेत आलेला मोठा बदल दर्शवितो. बंडखोरीच्या चौथ्या वर्षात जेरूसलेमला वेढा पडला होता, तेव्हा बंडखोरांचा उत्साह आणि स्वातंत्र्याची अपेक्षा कोलमडू लागली होती असे उत्खनन संचालक युवाल बारुख यांनी सांगितले.
हे नाणे आता जे आणि जीन शॉटनस्टीन नॅशनल कॅम्पस फॉर द आर्कियोलॉजी ऑफ इस्रायलमध्ये प्रदर्शित केले जाणार आहे. चालूवर्षी जेरूसलेममध्ये अनेक महत्त्वपूर्ण शोध लागले आहेत. चर्च ऑफ द होली सेपल्चरमध्ये प्राचीन उद्यानाचा शोध लागला. माउंट सिय्योनवर स्थित रुम ऑफ द लास्टर सपरमध्ये शतकांपेक्षा जुने शिलालेख पुन्हा समोर आले.









