भारताकडून पाणी बंद, अनेक शहरांमध्ये दंगली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पेहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे परिणाम दिसण्यास प्रारंभ झाला आहे, असे पाकिस्तानातून येणाऱ्या वृत्तांवरुन समजत आहे. पाकिस्तानात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून कराची आणि इतर मोठ्या शहरांमध्ये पाण्यासाठी दंगली होत असल्याचे वृत्त आहे. अनेक स्थानी पोलिसांना लाठीमार करावा लागला असून आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या जाळण्याचे प्रकार घडले आहेत, अशी माहिती आहे. त्याहीपेक्षा गंभीर स्थिती अशी, की पाकिस्तानचे हजारो सैनिक सैन्यातून बाहेर पडून आपापल्या घरी परतल्याचीही माहिती काही वृत्तवाहिन्यांकडून देण्यात येत आहे.
भारताने सिंधू जलकरार स्थगित करुन अद्याप एक आठवडाही झालेला नाही. पण, या निर्णयाचा परिणाम पाकिस्तानवर होऊ लागल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या तीव्र उन्हाळा आणि भारताचा निर्णय यामुळे पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचा निषेध करत लोक रस्त्यांवर उतरत असून त्यांची पोलिसांशी चकमक होत आहे.
पोलिसांच्या वाहनांना आगी
पाणी न मिळाल्याने संतप्त जमावांनी पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य केले आहे. अनेक वाहने जाळण्यात आली असून काही वाहनांची तोडमोड करण्यात आल्याची दृष्ये टीव्हीवरुन प्रसारित होत आहेत. हजारो लोक प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. पाकिस्तानने हा जनक्षोभ दडपण्याचा आणि जगापासून लपविण्याचा प्रयत्न केला असला, तरी तो देश यात अपयशी होत असल्याचे दिसत आहे.
सूत्रांच्या महितीनुसार सैनिकांचे राजीनामे
पाकिस्तानी फौजेत बंडाळी माजल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. या वृत्तानुसार हजारो पाकिस्तानी सैनिक लढण्यास तयार नाहीत. त्यांनी सेना सोडली असून ते घरी जात आहेत. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या वृत्ताला पाकिस्तानकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. तरीही अनेक स्वतंत्र व्रासंस्थांच्या म्हणण्यानुसार सैन्यात नाराजी आणि बेदिली माजली आहे. यासंबंधीचे चित्र येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
भारताचा धसका की नवी खेळी ?
पाकिस्तानी फौजेला लढण्याची सवय नाही, असे प्रतिपादन केले जाते. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाचे पर्यवसान युद्धात होऊ शकते. अनेक पाकिस्तानी सैनिकांना हे युद्ध नको आहे. त्यामुळे त्यांनी पलायनाचा मार्ग स्वीकारला आहे, अशी माहिती मिळत आहे. तथापि, हा एक बनावही असू शकतो. भारताला युद्धात खेचण्याची ही खेळीही असू शकते. त्यामुळे भारतीय सेना आणि भारताचे सरकार यांनी पूर्ण माहिती घेऊनच पुढचे पाऊल उचलावे, असा सावधगिरीचा इशारा अनेक अनुभवी तज्ञांनी दिला आहे. भारतानेही पाकिस्तानातून येणारी ही वृत्ते खरी आहेत, असे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे नेमकी परिस्थिती स्पष्ट होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.









