बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगाजवळ बुधवारी दुपारी पेट्रोल-डिझेलवाहू टँकर उलटला. या घटनेत हजारो लिटर पेट्रोल-डिझेल महामार्गावरून वाहून गेले. काहीकाळ महामार्गावरील वाहतूकही सर्व्हिस रोडवरून वळवावी लागली. देसूर डेपोतून केए 23 ए 8171 क्रमांकाचा टँकर पेट्रोल-डिझेल घेऊन बैलहोंगलकडे जात होता. त्यावेळी हलगा येथील भरतेश शाळेजवळ चालकाचे नियंत्रण सुटून टँकर महामार्गावर उलटला. केवळ सुदैवाने या घटनेत प्राणहानी झाली नाही. टँकरमधून पेट्रोल-डिझेल रस्त्यावर वाहू लागले. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अनर्थ टाळण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. महामार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडवरून वळविण्यात आली. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
खबरदारीमुळे मोठा अनर्थ टळला
क्रेनच्या साहाय्याने टँकर उभा करण्यात आला. तोपर्यंत हजारो लिटर पेट्रोल-डिझेल रस्त्यावरून वाहून गेले होते. हीच संधी साधून काही जणांनी बकेट, बाटल्यातून पेट्रोल-डिझेल संग्रहित करून नेले. पोलीस व अग्निशमन दलाने घेतलेल्या खबरदारीमुळे मोठा अनर्थ टळला.









