म्यानमारच्या चीन-कुकी लोकांचा 7-8 गावांमध्ये अवैध कब्जा : मणिपूरमधून हुसकावून लावण्याचा प्रकार
वृत्तसंस्था/ आयझोल
मणिपूरमध्ये हुसकावून लावण्यात आलेले म्यानमारचे चीन-कुकी लोक मिझोरममध्ये अवैध प्रवेश करत आहेत. मागील एक आठड्यात सुमारे 5 हजार घुसखोर जंगलामधून मिझोरममध्ये दाखल झाले आहेत. चम्फाई जिल्ह्यातील खुआंगफाह आणि वाइखाव्लांग यासारख्या सीमावर्ती गावांमध्ये त्यांनी ठाण मांडले आहे.
म्यानमारचे नागरिक 17 मे पासून घुसखोरी करत आहेत. चम्फाईत म्यानमारच्या घुसखोरांची संख्या 16 हजारांहून अधिक झाली आहे. 7-8 गावांमध्ये त्यांनी अवैध कब्जा केला आहे. बहुतांश घुसखोरांनी भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेनजीक खुआंगफा आणि वैखावत्लांग भागात स्वत:च्या नातलगांच्या घरांमध्ये आश्रय घेतला असल्याचे चम्फाईचे उपायुक्त जेम्स ललिन्छाना यांनी सांगितले.
हे घुसखोर स्वत:ला म्यानमारमधील गृहयुद्धाचे पीडित ठरवत आहेत, परंतु यातील बहुतांश जणांना अलिकडेच मणिपूर सरकारने हुसकावून लावले होते. या घुसखोरांच्या हालचालींची आम्हाला माहिती आहे. म्यानमारमध्ये स्थिती सुधारल्यावर ते मायदेशी परततील असे आमचे मानणे असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सीमेवर अतिरिक्त तैनात
मिझोरमला लागून असलेली म्यानमार सीमा खुली आहे. मिझोरमचे 6 जिल्हे चम्फाई, सियाहा, लॉन्ग्टलाई, हनाहथियाल, सेरछिप आणि सैतुअल हे म्यानमारच्या सीमेला लागून आहेत. येथील 11 जिल्ह्यांमध्ये मागील 3 वर्षांमध्ये 35 हजारांहून अधिक म्यानमारचे नागरिक अवैध वास्तव्य करत आहेत. घुसखोरांमध्ये सुमारे 1300 बांगलादेशी देखील असून त्यांनी लांग्त्लाई जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. म्यानमारच्या घुसखोरांच्या हालचालींमुळे सीमेवर आसाम रायफल्सचे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच मोबाईल व्हीकल चेकपोस्टही वाढविण्यात आले आहेत. दोन्ही देशांना विभागणाऱ्या तियाऊ नदीच्या काठावरही अतिरिक्त जवान तैनात आहेत, परंतु म्यानमारचे नागरिक आता जंगलामधून घुसखोरी करत आहेत.
घुसखोरांना परत पाठविले
मणिपूर हिंसेवेळी शेकडो चीन-कुकी लोक मिझोरममध्ये पोहोचले होते. सीमा खुली असल्याने मिझोरम-म्यानमारच्या परिवारांमध्ये नातेसंबंध आहेत. याचमुळे ते सहजपणे सीमेच्या पलिकडे जात असतात. फेब्रुवारी महिन्यात 1100 चीन-कुकी लोकांना हेलिकॉप्टरद्वारे म्यानमारमध्ये परत पाठविण्यात आले होते.









