कोल्हापूर :
सौंदत्ती डोंगरावर शनिवारी साजरी झालेल्या रेणुकादेवीच्या यात्रेचे औचित्य साधत कोल्हापुरातील हजारो भाविकांनी यल्लमाचा ओढ्यावरील रेणुका मंदिरातील देवीचे दर्शन घेत मनोकामना व्यक्त केली. दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची लागलेली रिघ रात्री दहापर्यंत अखंडपणे कायम होती. रात्री नऊच्या सुमारास रेणुकादेवीचा पालखी सोहळा साजरा केला. उदं ग आई उदं गजर आणि भंडाऱ्याची उधळण करत पालखी नजिकच्या जमदग्नी ऋषी मंदिरात नेली. येथे कंकण विमोचन सोहळा केला. यामध्ये शेकडो महिलांनी आपल्या हातातील काकणे वाढवत रेणुका देवीचे नामस्मरण केले.
दरम्यान, सौंदत्ती डोंगरावरील रेणुकादेवीच्या यात्रेत ज्या पद्धतीने धार्मिक विधी केले अगदी त्याच पद्धतीने यल्लमाच्या ओढ्यावरील रेणुकादेवी मंदिरातही दिवसभर धार्मिक विधी केले. परंपरेनुसार पहाटेच्या सुमारास रेणुकादेवीला अभिषेक केला. त्यानंतर शालू अलंकार पूजा बांधून देवीचे भाविकांना दर्शन देण्यास सुऊवात केली. दिवसभरात हजारो भाविकांनी देवीच्या शालू अलंकार पुजेचे दर्शन घेतले. दर्शनासाठी क्षणाक्षणाला शेकडो भाविक मंदिरात होत राहिल्याने मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता. आजच्या दिवशी पतीदेव जमदग्नी ऋषी यांचे निधन होऊन रेणुकादेवीला वैधव्य आले होते. या दुखद घटनेचे स्मरण म्हणून मंदिरातील रेणुकादेवीला अभिषेक करून तिला पांढरी साडी नेसवण्यात आली.
रात्री नऊच्या सुमारास रेणुका देवीचा पालखी सोहळा साजरा केला. तत्पुर्वी रेणुका देवीचा टाक विराजमान केलेली पालखी मंदिराच्या पिछाडीस उभारलेल्या जगाच्या शेडमध्ये नेली. येथे रेणुकादेवीच्या टाकाला अभिषेक कऊन ओढ्याला नैवेद्य अर्पणही केला. यानंतर रेणुकादेवीचा टाक पालखीमध्ये विराजमान कऊन भाविकांनी पालखीला खांद्यावर घेतले. उदं ग आई उदं गजर करत आणि भंडाऱ्याची उधळत करत पालखीला जमदग्नी ऋषी मंदिराकडे नेण्यात आले. येथे पारंपरिक पद्धतीने होमहवन केले. त्यानंतर कंकण विमोचन सोहळा साजरा केला. यामध्ये उपस्थित शेकडो महिलांनी आपल्या हातातील काकणे वाढवत जमदग्नी ऋषी आणि रेणुकादेवीचे नामस्मरण केले. त्यानंतर सर्व काकणांचा खच होमाला अर्पण केला. अन्य धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर पालखीने पुन्हा रेणुकादेवीच्या मंदिराकडे प्रयाण केले. पालखी मंदिरात आल्यानंतर तिचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अक्षरश: झुंबड उडाली. उदं ग आई उदंचा अखंड गजराने मंदिर व परिसर गर्जुन केला. अशा वातावरणातच पालखीने रेणुकादेवी, परशराम आणि मातंगीदेवीच्या मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या. पालखी सोहळ्याची सांगता केल्यानंतर जडअंतरणाने रेणुकादेवीच्या पांढऱ्या साडीतील पुजेचे दर्शन घेऊन सर्वच भाविक माघारी परतले.








