दोन दशकांमधील सर्वात मोठा साठा, एनसीबीची माहिती
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) एका मोठ्या कारवाईत एलएसडीचा अडीच हजार कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच भारतभर पसरलेले अमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून अन्य अमली पदार्थही जप्त करण्यात आले.
एलएसडी (लिसर्जिक अॅसीड डायइथिलामाईड) हा कृत्रिम अमली पदार्थ असून तो केवळ 0.1 ग्रॅम इतक्या प्रमाणातच साठविण्याची अनुमती आहे. मात्र, जप्त केलेला साठा त्याच्यापेक्षा हजारो पटींनी जास्त आहे. एलएसडीचे 15,000 ब्लॉटस् जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2.5 किलो मारिजुआना आणि 4.65 लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. 20 लाख रुपयांची बँक ठेव सील करण्यात आली, अशी माहिती कक्षाचे उपमहासंचालक ग्यानेश्वर सिंग यांनी दिली.
रॅकेट उद्ध्वस्त
भारतभर पसरलेले आणि पोलंड, नेदरलंडस् आणि अमेरिका आदी देशांमध्ये कार्यरत असलेले रॅकेटही या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले. भारतातील राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि दिल्ली आदी राज्यांमध्येही या रॅकेटने अमली पदार्थांचा बेकायदेशीर व्यापार चालविला होता.
केले होते आयात
एलएसडी हे द्रव्य भारतात पोलंड व नेदरलंडस्मधून आयात केले जाते. त्यानंतर ते भारतात विकले जात होते. तसेच भारतातून इतर जवळच्या देशांमध्येही ते निर्यात केले जात होते. या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने या अवैध व्यापाराला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अटक केलेल्या तस्करांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात धाडसत्र सुरू केले जाण्याची शक्यता आहे. डार्कनेटच्या माध्यमातून हा व्यापार चालत असे, अशी माहितीही एनसीबीला उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन अधिकाऱ्यांनी केले.
वास आणि चवरहित
एलएसडी हा अमली पदार्थ चवरहित आणि वासरहित असतो. त्याची वाहतूक पुस्तकांमधून करता येते. त्यामुळे तो शोधून काढणे कठीण असते. हा पदार्थ भारतातील तरुण वर्गात लोकप्रिय होत आहे, ही बाब अत्यंत धोकादायक आहे, अशी माहिती एनसीबी अधिकाऱ्यांनीं मंगळवारी पत्रकारांना दिली.









