कोट्यावधीची देव-घेव, पक्षकारांचा प्रतिसाद
प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वसामान्य जनतेचे खटले तातडीने सोडविण्यासाठी लोकअदालत भरविली जाते. शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत भरविण्यात आली. मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजयालक्ष्मीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत भरविण्यात आली. त्यामध्ये हजारो खटले निकालात काढण्यात आले आहेत. याचबरोबर कोट्यावधी रुपयांची देव-घेवदेखील करण्यात आली आहे. यामुळे न्यायालयामध्ये मोठी गर्दी झाली होती.
तीन महिन्यांतून एकदा राष्ट्रीय लोकअदालत भरविली जाते. या लोकअदालतीमधून प्रलंबित खटले निकालात काढले जातात. बँक कर्जवसुली, सहकारी पतसंस्था कर्जवसुली, सोसायटी कर्जवसुलीसह इतर खटलेदेखील निकालात काढले जातात. दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक, विमा नुकसानभरपाई याचबरोबर चेक बॉऊन्सचे खटले निकालात काढून पक्षकारांचा वेळ आणि खर्च वाचविला जातो.
प्रत्येक न्यायालयात वादी-प्रतिवादी यांना समोर बसवून न्यायाधीश हे खटले निकालात काढत आहेत. यावेळी वादी-प्रतिवादींचे वकीलदेखील उपस्थित राहतात. त्यांच्या समोरच तसेच सहमतीने हे खटले निकालात काढण्यात येत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये हजारो खटले निकालात काढून कोट्यावधी रुपयांची देव-घेव झाली आहे. शनिवारी झालेल्या लोकअदालतीमध्येही मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.









