17 जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत : जिल्ह्यात 1089 जागा भरणार, इच्छुक उमेदवारांची धावपळ
बेळगाव : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या 1089 रिक्त जागांसाठी हजारो अर्ज दाखल होऊ लागले आहेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 जुलैपर्यंत आहे. त्यानंतर किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले, हे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील विविध अंगणवाड्यांमध्ये सेविका आणि मदतनीसांच्या रिक्त जागा आहेत. यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 1089 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी 283 सेविका व 806 मदतनीसांच्या जागा भरल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील गोकाक, बैलहोंगल, बेळगाव, कागवाड, खानापूर, निपाणी, रामदुर्ग, सौंदत्ती आदी ठिकाणी जागा रिक्त आहेत. त्यामुळे काही अंगणवाड्यांमध्ये सेविकांची कामे मदतनीसांनाच करावी लागत आहेत. त्यामुळे बालचमूंकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळेनासा झाला आहे. यासाठी या रिक्त जागा भरल्या जात आहेत.
विधवा, दिव्यांग महिलांना प्राधान्य
अंगणवाडी सेविकांसाठी 12 वी पास तर मदतनीसांसाठी दहावी पास असणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेत विधवा, दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. संबंधितांचे अर्ज न आल्यास इतर महिलांचा विचार केला जाणार आहे. काही अंगणवाड्यांमध्ये सेविका नाहीत तर काही अंगणवाड्यांमध्ये मदतनीस नाहीत. त्यामुळे कामकाज विस्कळीत होऊ लागले आहे. याची दखल घेत महिला व बालकल्याण खात्याने रिक्त जागांवर सेविका आणि मदतनीस भरण्याचा निर्णय घेतला आहे.
सीडीपीओ कार्यालयात अर्जांचा स्वीकार
जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीसांच्या 1089 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने सुरू आहे. सीडीपीओ कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत. 17 जुलै ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर एकूण किती अर्ज आले हे समजणार आहे.
– नागराज आर. (सहसंचालक महिला व बालकल्याण खाते)









