कोल्हापूर :
प्रशासनातील उत्कृष्ठ कामासाठी कोल्हापूर जिल्हा हा राज्यात आघाडीवर आहे. त्यामुळे शासनाच्या योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत.चांगले काम करणाऱ्यांचे कौतूक निश्चितपणे केले जाईल. पण चुकीचे काम करून सर्वसामान्य जनतेला नाहकपणे त्रास देणाऱ्यांची खैर नाही, असा इशारा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा परिषदेतील आढावा बैठकीत दिला.
पालकमंत्री अबिटकर यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कामाकाजाचा आढावा घेण्यासाठी विभागप्रमुखांची बैठक घेतली. उपस्थित अधिकाऱ्यांकडून विभागनिहाय कामांची माहिती घेऊन त्यांनी सूचना दिल्या. जिल्हा परिषदेत गेल्या काही वर्षांपासून प्रशासकराज आहे. त्यामुळे जि.प.तीलकामकाजावर लोकप्रतिनिधींचे लक्ष असावे या हेतूने आढावा बैठक घेऊन कामकाजाची माहिती घेतली असल्याचे आबिटकर यांनी नमूद केले.
- विकासकामे दर्जेदार करावीत
बांधकाम विभागातील कामांची माहिती घेतल्यानंतर विभागाकडून केली जाणारी सर्व विकासकामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश दिले. आजरा आणि भुदरगड पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर सुरुवातीलाच स्वच्छतागृहातील दूर्गंधीचा वास येतो. त्यामुळे अशा इमारती बांधणाऱ्या ठेकेदारांचा चौकात बोलावून सत्कार करायला हवा अशा संतप्त भावना पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे यापुढे जि.प.तील विविध विभागातील इमारतींचे बांधकाम करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले.
- औषध भांडाराच्या कामकाजात सुधारणा करा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने अलर्ट रहावे. साथीचे आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी. जि.प.तील औषध भांडारातील औषध निर्माण अधिकारी आणि एकूणच भांडारातील कामकाजाबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे औषध भांडारातील कामकाजाबाबत सुधारणा करून तक्रारी येणार नाही याची काळजी घ्यावी असे पालकमंत्री आबिटकर यांनी नमूद केले.
- केवळ राजकारण करणारा नव्हे, विकासामध्ये सहभागी असणारा पालकमंत्री
मी केवळ राजकारण करणारा पालकमंत्री नाही. तर जिह्याच्या सर्वांगिण विकासासाठी झोकून देऊन काम करणारा विकासामध्ये सहभागी असणारा पालकमंत्री आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठी मी सदैव अग्रेसर असेल असे पालकमंत्री आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना निक्षून सांगितले.








