19 खलिस्तान समर्थकांची नावे समोर : रॉकडून एनआयएला मदत
वृत्तसंस्था/ लंडन
लंडनमधील भारतीय दूतावासावर खलिस्तान समर्थकांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याची चौकशी करणाऱ्या एनआयएने 15 जणांची ओळख पटविली आहे. दोन महिन्यांपूर्वीच एनआयएने 45 हल्लेखोरांची छायाचित्रे जारी केली होती. एनआयएच्या पथकाने लंडनमधील दूतावासावर हल्ला झालेल्या ठिकाणावरून पुरावे जमविले होते. हल्ल्याशी निगडित 5 व्हिडिओ जारी करत लोकांना हल्लेखोरांची ओळख पटविण्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सुमारे 500 हून अधिक जणांनी कॉल करत संशयितांबद्दल माहिती पुरविली होती. भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ने संशयित हल्लेखोरांची मोठी यादी तयार केली होती.
आता या 15 जणांची छायाचित्रे इमिग्रेशन विभागाला पाठविण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी होऊ शकेल. हल्लेखोरांचा शोध अन् अटकेसाठी नागरी उड्डाण मंत्रालयाचीही मदत घेतली जाणार आहे. सध्या अधिकाधिक सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले जात असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
दूतावासातील वेलफेअर अधिकारी किरण कुमार वसंत यांनी हल्ल्याप्रकरणी अवतार सिंह उर्फ खांडा, गुरचरण सिंह आणि जसवीर सिंह विरोधात एफआयआर नोंदविला होता. खांडाचा जून महिन्यात मृत्यू झाला असून त्याचे दस्तऐवज ब्रिटन सरकारकडून मागविण्यात आले आहेत.
एनआयएने याप्रकरणी आसामच्या डिब्रूगढ तुरुंगात कैद खलिस्तानी अमृतपाल सिंह आणि त्याच्या सहकाऱ्यांचीही चौकशी केली आहे. लंडनमधील भारतीय दूतावासासमोर 19 मार्च रोजी खलिस्तान समर्थकांनी निदर्शनांदरम्यान हल्ला केला होता. एप्रिल महिन्यात गृह मंत्रालयाने याप्रकरणी एनआयए चौकशीची अनुमती दिली होती. प्रारंभिक तपासात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा यात हात असल्याचे संकेत मिळाले आहेत.
गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार दिल्ली पोलिसांनीही युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. हल्लेखोरांच्या विरोधात पाऊल उचलण्यासाठी ब्रिटन सरकारकडे संपर्क साधण्यात आला आहे.









