पाच सदस्यीय चौकशी समितीचा अहवाल सादर
कोल्हापूर प्रतिनिधी
सीपीआर हॉस्पिटल परिसरात मिळून आलेली दोन मृत अर्भके ही ‘सीपीआर’मधील नाहीत, असे पाच सदस्यीय चौकशी समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल सोमवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांना सादर करण्यात आला.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये गुरूवारी सकाळी मोकाट कुत्र्यांनी दोन मृत अर्भकांना ओढत आणून पी. एम. रूमशेजारी टाकले होते, या घटनेने खळबळ उडाली होती. लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, सीपीआरच्या प्रसुती विभागात याबाबत चौकशी करता ही अर्भके येथील नसल्याचे समोर आले होते. तरीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी मृत अर्भक प्रकरणी पाच जणांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने तीन दिवसांत चौकशी करून हा अहवाल सोमवारी अधिष्ठाता डॉ. दीक्षित यांना सादर केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसुती विभागातील डॉ. जोत्स्ना देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीत महापालिकेतील आरोग्य निरीक्षक आणि सीपीआरमधील अन्य तीन विभागांतील प्रमुखांचा समावेश होता. समितीच्या अहवालात हॉस्पिटल परिसरात 20 एप्रिलला दोन मृत अर्भके आढळली. पण या दिवशी स्त्रीरोग, प्रसुतीशास्त्र विभागात नैसर्गिक आणि सिझेरीयन प्रसुती झालेल्या अर्भकांपैकी पुरूष जातीची दोन अर्भके मृत जन्मास आली होती. ही दोन्ही अर्भके कदमवाडी येथील स्मशानभूमीत दफन केल्याची पावती जमा झाली आहे. त्यामुळे त्या दिवशी सापडलेली मृत अर्भके ही सीपीआर हॉस्पिटलमधील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश कांबळे यांनी दिली.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये 5 दिवसांपुर्वी मृत अर्भकांना कुत्र्यांनी ओढत आणले होते. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेच्या डॉग स्कॉड पथकाने सीपीआर परिसरातील मोकाट कुत्री पकडून नेल्याची माहिती सीपीआर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश कांबळे यांनी दिली.









