कोल्हापूर :
तो कोल्हापूरचा. पण फिरत्या व्यवसायानिमित्त पुण्यात. पण रोज कोल्हापूरला घरात सकाळ, संध्याकाळी फोन करायचा. त्या दिवशीही सकाळी त्याने फोन केला. आईला म्हणाला, तब्येत थोडी बिघडली आहे. आई म्हणाली, दगदग करून घेऊ नकोस. विश्रांती घे. रात्री त्या माऊलीने पुन्हा तब्येत विचारायला काळजीने फोन केला. पण फोनच उचलला गेला नाही. झोपला असेल म्हणून पुन्हा काही वेळ फोन केला नाही. पण शेवटी माऊलीचेच काळीज. तीने पुन्हा मध्यरात्री फोन केला. पुन्हा फक्त कानावर रिंगच. मग मात्र माऊली बावरली. ती रात्री उशिरापर्यंत फोनवर फोन करत राहिली. रात्रभर तिला झोप लागली नाही.
सकाळी माऊलीने पुन्हा फोन करणे सुरू केले. पण कानावर यायची ती फक्त रिंगच. नंतर–नंतर त्या रिंगचा टोनही तिला मुलाच्या चिंतेने भेसूर जाणवू लागला. मग नको त्या शंका मनात येऊ लागल्या. अखेर ती उठलीच व मुलीला सोबत घेऊन पुण्याला गेली. आपण कोल्हापुरात बऱ्यापैकी एखादा पत्ता शोधू शकतो. पण अवाढव्य पुण्यात तो पत्ता शोधणेही अवघड झाले. चार ते पाच तास ती पत्ता शोधत राहिली. एका मित्राला अस्पष्ट असा पत्ता माहीत होता. मग त्याने जवळपासची काही ठिकाणे सांगितली आणि आई आपल्या मुलाच्या पत्त्यावर सायंकाळी पाच वाजता पोहोचली.
बिल्डिंगच्या दारातून पुन्हा तिने एक फोन लावला, पण रिंगच ऐकू येऊ लागली. मग ती खोलीच्या दरवाजासमोर आली. दरवाजा आतून बंद. तिने दरवाजा जोराने खटखटला, प्रतिसाद नाही. ‘आनंद, अरे आनंद..’ म्हणून ती आर्ततेने हाक मारू लागली. पण आतून ‘ओ’ म्हणून उत्तर नाही. ती घाबरली. पटकन् खालीच बसली. तिने बिल्डिंगमधल्या इतर रहिवाशांशी संपर्क साधला. सर्वांनी मिळून पोलिसांना कळविण्याचा निर्णय घेतला. पोलीस आले. त्यांनी खटपटी करून दरवाजा उघडला आणि आतले दृश्य पाहून आईच्या काळजाचा ठोका चुकला.
आत बेडवर आनंद एका हात छातीवर ठेवलेला व एक हात कदाचित थोडा लांबवर ठेवलेला मोबाईल घेण्यासाठी लांबवलेल्या अवस्थेत तो निपचित होता. तशा अवस्थेत आनंदला पाहून काळीज गोठून गेलेल्या माऊलीला काही सूचेनाच. कंठ दाटून आलेला. पण कंठातून हुंदकाही फुटेना. इतरांनी तिला सावरले. भानावर आणले. मग काही वेळाने आईच्या त्या आर्त हंबरड्यापुढे पोलिसांचेही डोळे पाणावले.
ही घटना कोल्हापुरातल्या मेघा कोलते या माऊलीच्या वाट्याला आली. त्या वालावलकर हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका. त्यांचा मुलगा आनंद बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, एम.बी.ए. चांगला ट्रेकर. महाराष्ट्रातले सगळे गड–किल्ले पायाखाली घातलेले. असंख्य मित्रांचे त्याचे जाळे. त्यामुळे कायम उत्साही. कोल्हापुरात राहून बिलियर्ड्सचा छंदही त्याने जपला. सॉईल टेस्टिंगच्या व्यवसायाच्या निमित्ताने फिरत राहिला. रोज कुटुंबाची आठवण फोन करून जपत राहिला. पण छोटे आजाराचे निमित्त घडले अन् हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याला गाठले. आणि एका माऊलीने मुलाच्या आठवणीचे शत्रूच्याही वाट्याला येऊ नये असे 23 तास अनुभवले.








