गुरुवारी पहाटेपासूनच कामबंद : मनपा आयुक्तांशी चर्चा; तोडगा नाहीच
बेळगाव : महापालिकेमध्ये नव्याने 138 सफाई कामगार आणि चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांना वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी पहाटे कामबंद आंदोलन सुरू केले. याची माहिती मिळताच महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे त्याठिकाणी हजर होऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यामधून काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे. सदाशिवनगर येथील महापालिकेच्या गोडावूनसमोरच हे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सर्व वाहने बंद ठेवण्यात आली होती. सध्या कंत्राटदारांकडे असलेल्या वाहनांचा वापर करून शहरातील कचऱ्याची उचल करण्यात आली आहे. यामुळे काहीसा दिलासा मिळाला तरी कचरा उचल करण्याची समस्या पुन्हा गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून 138 कामगारांची नियुक्ती करण्यात आली. मात्र ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांचे वेतन देण्यात आले नाही. याबाबत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्येही या विषयावर जोरदार चर्चा करण्यात आली. त्या सभेमध्ये महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सदर नेमणूक नियमानुसार झाली नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमण्याचेही ठरविण्यात आले आहे.
सदर कामगारांना नेमणूक केल्यानंतर वेतन देणे गरजेचे होते. मात्र बरेच महिने उलटले तरी कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही. यापूर्वी या कर्मचाऱ्यांनी तीनवेळा आंदोलने केली आहेत. मात्र आता बेमुदत आंदोलन पुकारले आहे. गुरुवारी पहाटेपासूनच हे आंदोलन सुरू करण्यात आले. दिवसभर त्याठिकाणी ठाण मांडून हे कर्मचारी होते. जेवण नाही, पाणी नाही तरीदेखील आंदोलन करत आहे. मात्र आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कर्मचारी करत होते. गोडावूनच्या गेटसमोरच आंदोलन छेडण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेची सर्वच वाहने अडकून पडली आहेत. सध्या शहरातील कचरा उचल करण्यासाठी 9 जणांकडे कंत्राट दिले गेले आहे. मात्र या 9 कंत्राटदारांनी आम्हाला वेतन देण्यास टाळाटाळ केल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले. एकूणच सदर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वादावरून गोंधळ उडाला असून आता हा गोंधळ सोडविण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.









