गोव्यात गणेशोत्सवाची अद्याप धामधूम सुरू आहे. दीड दिवशीय, पाच, सात, नऊ, अनंत चतुर्दशी, अकरा दिवशीय सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. गोव्यात काही ठिकाणी एकवीस दिवशीय सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आहे. याची सांगता सोमवार दि. 9 ऑक्टो. रोजी होणार आहे. कोरोनाचा संसर्ग गेल्याने सध्या गोमंतकीय उत्साही मूडमध्ये असले तरी डेंग्यूसारख्या आजाराने गोमंतकीयांना त्रस्त करून सोडले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न सध्या सतावत आहे.
दीड, पाच, सात, नऊ, अनंत चतुर्दशी, अकरा दिवशीय गणेशोत्सव झाल्यानंतर अनेकांची पाऊले माशेल, कुंभारजुवे येथील एकवीस दिवसीय वैशिष्ट्यापूर्ण, कलात्मक गणेशमूर्ती व देखाव्यांचे दर्शन घेण्यासाठी वळायची. गोव्यात येणारे पर्यटकही याठिकाणी आवर्जून भेट देऊन आगळ्यावेगळ्या गणेशमूर्ती व देखाव्यांचे दर्शन घेऊन तृप्त व्हायचे. एकवीस दिवसांचा हा गणपती महोत्सव केवळ गोव्यातीलच नव्हे तर शेजारील राज्यातही भाविकांचे आकर्षण बनलेले होते परंतु कोरोनानंतर कुंभारजुवे, माशेल भागात गणेशचतुर्थी उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत आहे. यंदाही भाविकांसाठी भव्यदिव्य गणपती देखाव्यांचे दर्शन दुर्लभच राहणार आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या माटोळी सामानाचीही लाखोंची उलाढाल यंदा झाली आहे. काही गोमंतकीयांना यातून काहीशा प्रमाणात म्हणा उत्पन्न प्राप्त करता आले आहे.
गणेशोत्सव नजीक येऊन ठेपल्यानंतर तत्पूर्वी राजधानी पणजीत अष्टमीची फेरी भरवली जाते. यंदाही ही फेरी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अष्टमी फेरीच्या आयोजनात झालेला गैरप्रकार आणि गैरव्यवहारांचा पाढाच गेल्या शुक्रवारी झालेल्या पणजी महानगरपालिकेच्या बैठकीत विरोधी नगरसेवकांनी मांडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. या बैठकीत प्रचंड गदारोळ माजला. या फेरीसाठी वितरित करण्यात आलेल्या स्टॉल्स्च्या शुल्कात बेकायदा भरमसाठ वाढ करून दुकानदारांचे कंबरडेच मोडले होते. त्याशिवाय कित्येक स्टॉल्स फुकटातही वापरण्यास दिले होते. त्यामुळे ‘मनपा’चे काहीप्रमाणात नुकसानही झाले. पणजीतील मांडवीकिनारी थाटण्यात आलेल्या या फेरीत तब्बल 410 स्टॉल्स होते परंतु तेथील विक्रेते, व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी शौचालय वा स्वच्छतागृह यांची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. अष्टमी फेरीच्या शुल्कात वाढ केल्यामुळे मनपाला तब्बल 90 लाख रुपयांचा महसूल मिळाला असला तरी दुकाने थाटलेल्या विक्रेते, व्यापाऱ्यांची झालेली गैरसोय खरोखरच चिंताजनक आहे. मनपाकडून होणाऱ्या जाचातून, त्रासातून मुक्त व्हायचे असेल तर त्यांनी पणजीत अष्टमीची फेरी न भरविता पणजीनजीकच्या मेरशीसारख्या किंवा अन्य सोयीच्या भागात ही फेरी भरविण्याचा विचार करावा, असे सूचवावेसे वाटते.
परतीच्या मार्गावर असलेल्या पावसाने तर कहरच केला आहे. ऐन गणेशोत्सवात पावसामुळे गोमंतकीयांची गैरसोय केली आहे. संपूर्ण राज्याबरोबरच पणजी स्मार्ट सिटी पुन्हा ख•sमय झालेली आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे पणजीत बहुतांश रस्त्यावर मोठमोठे ख•s पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करत सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. जी-20 च्या काळात डांबरीकरण केलेले रस्तेही ख•sमय बनले आहेत. त्याचा फटका सर्वांना बसत आहे. या पावसामुळे याठिकाणी डांबरीकरण करता येत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीची वाताहत झाली आहे. या विषयावरही मनपाच्या बैठकीत गरमागरम चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम खाते, महानगरपालिका किंवा स्मार्ट सिटी यापैकी एकाही संस्थेने याप्रश्नी पुढाकार घेतलेला नाही. अशी बेजबाबदार कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या कामांचे ऑडिट करण्यात यावे व तोपर्यंत त्यांना पेमेन्ट करू नये, अशीही मागणी विरोधी नगरसेवकांनी केली आहे.
गोव्यात आज काही गावे वगळता प्रत्येक गावात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होत आहेत. लॉटरी, देणगी स्वरुपात मोठ्या प्रमाणात आर्थिक गंगाजळीही निर्माण होत आहे. हा निधी सत्कारणी लागणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रामध्ये काही गणेशोत्सव मंडळे झालेल्या आर्थिक लाभातून शाळा दत्तक योजना, गरीब घटकांसाठी मदत, अन्नदान तसेच अन्य काही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाऊले उचलणे आवश्यक आहे. केवळ उत्सवापुरते, मनोरंजनाच्या कार्यक्रमापुरतेच सीमित न राहता मंडळाचे समाजोपयोगी उपक्रम वर्षभर चालू राहणे गरजेचे आहे.
गेला महिना स्मशानभूमी प्रश्नावरून गाजला. पारंपरिक स्मशानभूमीवर काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याने मृतदेहांची अंत्यसंस्कारावेळी परवड होत आहे. गोव्यासारख्या राज्यात हे निश्चितच शोभादायक नाही. राज्य घटनेने दिलेल्या जगण्याच्या मूलभूत अधिकारात मरणानंतर अंत्यसंस्कार करण्यास मिळणेही अभिप्रेत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही तसा निवाडा दिला आहे. व्यक्ती मरण पावल्यानंतर सन्मानजनक पद्धतीने तिला निरोप देता आला पाहिजे. गोवा कायदा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष अॅड. रमाकांत खलप यांनी विधेयकाचा मसुदा करून सरकारला तेव्हाच सादर केला आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात हे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. ‘स्वयंपूर्ण गोवा’ प्रमाणेच गोवा सरकारने प्रत्येक गावात सार्वजनिक स्मशानभूमी मोहीम राबवावी जेणेकरून माणसाचा इहलोकीचा प्रवास तरी सुखाचा ठरावा.
पेडणे तालुक्यातील पालये गावातील सार्वजनिक गणेशोत्सवात झालेल्या सांगता सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप होते. त्यांनी यावेळी स्मशानभूमी विषयावर चांगलेच प्रबोधन केले. आज-काल होणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सवात केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम न होता, या व्यासपीठावरून वैचारिक समाजप्रबोधन होणे आवश्यक आहे.
राजेश परब








