कमी पावसाचा परिणाम, पर्यायी पीक म्हणून मका-कापसाला पसंती
बेळगाव : मागील दहा बारा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा तूर, मूग, सूर्यफूल पेरणीत मोठी घट झाली आहे. आधीच दीड महिना पावसाला उशिराने प्रारंभ झाला. आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमधील चिंतेत वाढ झाली आहे. खरीप हंगामात भात, ऊस, मका, बाजरी, चवळी, हरभरा, उडीद, कापूस, मोहरी, सूर्यफूल, सोयाबीन, तंबाखू आदी पिकांची पेरणी व लागवड करण्यात आली आहे. यंदा मान्सून आणि वळीव म्हणावा तसा झाला नसल्याने पेरणी हंगाम लांबणीवर पडला. जुलै पंधरवड्यानंतर झालेल्या पावसामुळे पेरणी कामे सुरळीत होती. मात्र आता पुन्हा पावसाने उघडीप दिल्याने पिकांना धोका निर्माण होऊ लागला आहे.
आठवड्याभरात पाऊस न झाल्यास पिके सुकण्याची भीती
जुलै शेवटच्या पंधरवड्यात झालेल्या पावसाने नदी, नाले आणि जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. विशेषत: जिल्ह्यातील कृष्णा, वेदगंगा, मलप्रभा, घटप्रभा आणि मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. मात्र आता पुन्हा पावसाचा जोर कमी झाल्याने पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. काही भागात उशिराने पावसाला सुरुवात झाल्याने पर्यायी पीक म्हणून कापूस आणि मक्यांची पेरणी करण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात पाऊस न झाल्यास पिके सुकण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सरासरी 86 टक्के पेरणीचे काम पूर्ण
यंदा 7.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 6.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 86 टक्के पेरणीचे काम झाले आहे. अथणी 70 टक्के, सौंदत्ती 72, कागवाड 73 तसेच बैलहोंगल तालुक्यात 79 टक्के पेरणी झाली आहे. यंदा केवळ 15799 हेक्टर क्षेत्रात कडधान्याची पेरणी झाली आहे. 10058 हेक्टर उद्दिष्टांपैकी 2986 हेक्टरात उडीद पेरणी झाली आहे. तेलबियांमध्ये 21580 हेक्टर क्षेत्रात भुईमूगची पेरणी अपेक्षित होती. मात्र केवळ 15060 हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. सूर्यफुलाच्या 4233 हेक्टर उद्दिष्टापैकी केवळ 742 हेक्टरात पेरणी झाली आहे. तर 99826 हेक्टर क्षेत्रापैकी 84281 हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा अपेक्षेपेक्षा कडधान्य पेरणी कमी झाली आहे.
रयत संपर्क केंद्रात संपर्क साधा- शिवनगौडा पाटील (कृषी खाते सहसंचालक)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 22 ऑगस्टनंतर चांगला पाऊस होणार आहे. शेतकऱ्यांना शेतीसंबंधी तक्रारी असल्यास जवळच्या रयत संपर्क केंद्रात संपर्क साधावा, शिवाय पिकांविषयी माहिती पाहिजे असल्यास कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी.









