चिपळूण :
यावर्षी मे महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात धो-धो पाऊस सुरू झाल्यानंतर जून महिन्यात काहीसा संथ झाला. त्यातही अधूनमधून आठवडाभर कोसळल्यानंतर दरवर्षीप्रमाणेच जून महिन्यातील आपली सरासरी गाठताना त्यामध्ये किंचितशी वाढही झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी 25 जूनपर्यंत 17.38, तर यावर्षी 20.96 टक्के इतका पाऊस जिल्ह्यात झाला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद लांजात तर आतापर्यंतचा कमी पाऊस दापोलीत झाला असल्याचे महावेधच्या पर्जन्यमान अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सध्या उघडीप असली तरी पाणथळ भागात भातलागवडीची कामे सुरू झाली आहेत.
जिल्ह्याची वार्षिक सरासरी 3,364 मि.मी. इतकी असली तरी साधारणपणे जिल्ह्यात सरासरी साडेतीन ते चार हजार मि.मी. पाऊस कोसळतो. दरवर्षी 7 जूननंतर पावसाला सुरुवात होते. मात्र यावर्षी मे महिन्यातच वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात घरा-दारांचे, शासकीय मालमत्तेची मोठी हानी झाली. दरवर्षी पेरणीनंतर जून महिन्यात पावसाची प्रतीक्षा करावी लागते. मात्र यावर्षी पेरणीपूर्वीच पाऊस सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. शेतं भरून गेल्याने पेरणी करायची कशी, पेरणी केलीच तर रोपं उगवणार कधी? अशा अनेक प्रश्नांबरोबरच कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीपर्यंत विषय गेला होता. मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस काहीसा थांबल्यानंतर पेरण्याही झाल्या आणि रोपंही उगवली. त्यापुढील शेतकऱ्यांच्या दृष्टीने पुढील प्रश्न आपोआप मिटले.
जून महिना सुरू झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात पावसाने सुरुवात केली. मात्र त्यामध्ये तितकासा जोर नव्हता. मात्र पुढील तिसऱ्या आठवड्यात चार-पाच दिवस मुसळधार पाऊस अगदी शंभर ते दीडशे मि.मी.पर्यंत कोसळल्याने जून महिन्याची नेहमीची सरासरी गाठणे सहजशक्य झाले. सद्यस्थितीत पावसाने उघडीप घेतली आहे. पाणथळ भागात शेतकऱ्यांनी भातलावणीची कामे सुरू केली आहेत. हवामान खाते दररोज मुसळधार पावसाचे इशारे देत असले तरी तितकासा पाऊस कोसळताना दिसत नाही. यावर्षी जिल्ह्यात सरासरी 705 मि.मी., तर गतवर्षी 584.77 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी सर्वाधिक 818 मि.मी. इतका पाऊस लांजात तर 599.30 इतका कमी पाऊस दापोलीमध्ये झाल्याचे नोंद आहे. तर महारेनच्या पर्जन्य नोंद अहवालानुसार गतवर्षी जूनमध्ये जिल्ह्यात 16.80 मि. मी., तर यावर्षी 24.01 मि. मी. इतका पाऊस झाल्याची नोंद केली गेली आहे. दरम्यान, पावसाची उघडीप असली तरी पाणथळ भागात भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. तर पाणी नसलेल्या ठिकाणच्या भातलावण्या या काहीशा खोळंबल्या आहेत. पाऊस जोरदार सुरू झाला तर सर्वत्र शेतीच्या कामांना अधिक वेग येणार आहे.
तालुके यावर्षीचा पाऊस गतवर्षीचा पाऊस
मंडणगड 785.10 461.60
दापोली 599.30 624.10
खेड 723.90 654.40
गुहागर 680.90 602.10
चिपळूण 658 789.40
संगमेश्वर 715.50 626.00
रत्नागिरी 612.80 480.80
लांजा 818.30 504.30
राजापूर 752.20 520.20








