लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट : सोयाबीन,भुईमूग, रताळीला पसंती : बेळगावच्या बटाट्याला मागणी अधिक
बेळगाव : बियाणाच्या दरात झालेली वाढ, उत्पादनात झालेली घट व इतर कारणामुळे बटाटा लागवडीत मोठी घट झाली आहे. यंदाच्या हंगामात केवळ 700 हेक्टरात बटाटा लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादनदेखील कमी होणार आहे. जालंधर, पंजाब, इंदोर येथील बटाट्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. बेळगाव येथील बटाट्याला विशिष्ट चव असल्याने मागणी अधिक होती, मात्र अलीकडे बटाटा उत्पादन म्हणावे तसे होत नसल्याने व दरदेखील योग्य मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बटाटा उत्पादनाकडे पाठ फिरविली आहे. त्याऐवजी सोयाबीन आणि रताळी वेल लागवडीला पसंती दिली आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीन, भुईमूग आणि रताळी वेल लागवडीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. मागील दोन वर्षात लागवडीनंतर बटाटा कुजला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला होता. शेतकऱ्यांनी आता पर्यायी पीक म्हणून इतर पिकांकडे कल वाढविला आहे.
गतवर्षी देखील बटाटा लागवडीत मोठी घट झाली होती. त्यामुळे उत्पादनही घटले होते. दरम्यान बाजारात जालंधर, पंजाब, इंदोर येथील बटाटा विक्रीसाठी दाखल झाला होता. यंदादेखील तीच परिस्थिती पहावयास मिळणार आहे. एपीएमसी बाजारात बाहेरुन मोठ्या प्रमाणात बटाटा येऊ लागला आहे. त्या तुलनेत स्थानिक बटाट्याला दरदेखील मिळेनासा झाला आहे. शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी बटाटा लागवड कमी करून इतर पिकांना पसंती दिली आहे. विशेषत: तालुक्यातील बेळवट्टी, बिजगर्णी, बेळगुंदी, अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते, हंदिगनूर, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, केदनूर, कडोली, मण्णीकेरी, कर्ले, मंडोळी, बंबरगे, हलगा, बस्तवाड, कल्लेहोळ, सोनोली आदी भागात बटाट्याची लागवड होत होती. मात्र यंदा या भागात बटाटा लागवड घटणार आहे. मशागत, शेणखत, रासायनिक खत, मजुरी आणि बी-बियाणांसाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र नैसर्गिक संकटे, किडीचा प्रादुर्भाव आणि इतर कारणांमुळे उत्पादनात घट होऊ लागली आहे. मात्र एकूण उत्पादनासाठी केलेला खर्चदेखील बटाटा पिकांतून मिळत नसल्याने फटका बसू लागला आहे. विशेषत: खरिप हंगामात लाल जमिनीत बटाटा लागवड केली जात होती. मात्र अलिकडे एकूण लागवडीतच घट झाली आहे. पावसाळी आणि उन्हाळी दोन्ही हंगामामध्ये बटाटा लागवड घटल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना परराज्यातील बटाट्यावरच समाधान मानावे लागणार आहे.









