केवळ 12 हजार बसपासचे वितरण
बेळगाव : शक्ती योजनेमुळे यंदा बसपासधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. प्रक्रियेला प्रारंभ होऊन आतापर्यंत केवळ 12 हजार विद्यार्थ्यांनीच बसपास घेतले आहेत. त्यामध्ये 12 हजार प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेजचे विद्यार्थी, 700 आयटीआय विद्यार्थी तर 3400 डिप्लोमा आणि पदवी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थिनींचा मोफत प्रवास सुरू झाल्याने यंदा ही संख्या निम्म्यापेक्षा अधिक घटली आहे. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की, दरवर्षी परिवहनकडून सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिले जातात. यंदादेखील जून महिन्यापासून नवीन बसपास प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र शक्तीयोजनेमुळे विद्यार्थिनींचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे केवळ विद्यार्थी बसपास घेऊ लागले आहेत. परिणामी एकूण बसपासधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे यंदा बसपासच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नापासून परिवहनला वंचित रहावे लागणार आहे. बेळगाव, रामदुर्ग आणि खानापूर या आगारातून दरवर्षी 71 हजाराहून अधिक विद्यार्थी बसपास घेतात. त्यामुळे परिवहनला बसपासच्या माध्यमातून उत्पन्नही बऱ्यापैकी प्राप्त होते. मात्र यंदा बसपास घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्यापेक्षा खाली आली आहे. त्यामुळे महसूलही कमी झाला आहे. 11 जूनपासून शक्ती योजना अमलात आली आहे. दरम्यान महिला आणि विद्यार्थिनींचा मोफत प्रवासही सुरू झाला आहे.
सेवासिंधू पोर्टलवर अर्ज
प्राथमिक, माध्यमिक आणि पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या बसपास प्रक्रियेनंतर आता आयटीआय, डिप्लोमा आणि पदवीच्या विद्यार्थ्यांच्या बसपास प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. बसपास प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. सेवासिंधू पोर्टलवर अर्ज केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होत आहे. मात्र यंदा विद्यार्थिनीच्या बसपासचा ताण कमी झाल्याने बसपास प्रक्रियाही सुरळीत सुरू आहे. शिवाय विद्यार्थ्यांनादेखील तातडीने बसपास मिळू लागले आहेत.
बसपासमधून मिळणारे उत्पन्नही कमी…- ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)
यंदा केवळ विद्यार्थी बसपास काढत आहेत. विद्यार्थिनींचा मोफत प्रवास सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बसपास घेतला जात नाही. एकूणच बसपासधारक विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बसपासमधून मिळणारे उत्पन्नही कमी झाले आहे.









