सध्या रिपरिप पाऊस सुरू : भागातील धबधबे ओसंडून वाहू लागले
वार्ताहर/कणकुंबी
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कणकुंबी पाणलोट क्षेत्रात यावर्षी आतापर्यंत 4100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्ग कामात गुंतला आहे. उत्तर कर्नाटकातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्यातील कणकुंबी भागात पावसाची रिपरिप सुरूच असून यावर्षी अद्याप (31 जुलैपर्यंत) एकूण 4100.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कणकुंबी पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे या भागातील सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत. गेल्या दोन्ही नक्षत्रात मिळून (मृग आणि आर्द्रा नक्षत्र) 1965.6 मि. मी. तर मे महिन्यात म्हणजे मान्सूनपूर्व 531.8 मि. मी. पाऊस झाला आहे. सध्या पुष्य नक्षत्रातील (म्हणजे म्हातारा) पाऊस सुरू असून कणकुंबी भागातील हुळंद, आमगाव, मान, चोर्ला, सडा गावातील पाणलोट क्षेत्रात कणकुंबीपेक्षाही अधिक पाऊस होतो. एकंदरीत कणकुंबी पाणलोट क्षेत्रात अद्याप म्हणजे मे महिन्यांपासून ते 31 जुलैपर्यंत एकूण 4100.6 मिलीमीटर पावसाची नोंद कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे.
यावर्षी म्हणजे मे महिन्यात 531.8 मि. मी., जून महिन्यात 1581.8 तर जुलै महिन्यात 1987.0 मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजे यावर्षी अद्याप एकूण 4100.6 मि. मी. पावसाची नोंद कणकुंबी येथे झाली आहे. कणकुंबी भागात विशेषत: मे महिन्यात पहिल्यांदाच 531.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दि. 23 मे रोजी 107 मि. मी. व 24 मे रोजी 125.2 मि. मी. पाऊस झाला आहे. यापूर्वी मे महिन्यात एवढ्या प्रमाणात पाऊस अलीकडच्या वर्षांत तरी झाला नाही.
काही दिवसांपासून पावसाने थोडी उसंत घेतलेली असून कणकुंबी भागातील मलप्रभा नदीसह लहान-मोठे सर्व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मागीलवर्षी जून महिन्यात केवळ 814.2 मिलिमीटर पाऊस झाला होता. यावर्षी मात्र जून महिन्यात 1581.8 मि. मी. पाऊस झाला आहे. गेल्या चार-पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी जून महिन्यात अधिक पाऊस झाला आहे. तसेच यावर्षी अद्याप झालेल्या पावसापैकी दि. 15 जून सकाळी 7 ते दि. 16 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासांत 186.2 मि. मी. हा या वर्षीतील सर्वाधिक पाऊस झाला आहे. आता पावसाने थोडी उसंत घेतल्याने शेतकरी वर्ग शेतीच्या कामात गुंतला आहे.









