रत्नागिरी :
राज्य सरकारकडून इयत्ता पहिली आणि दुसरीच्या नव्या शैक्षणिक रचनेविषयी मार्गदर्शक तत्त्वे आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पत्रक जारी केले आहे. यामध्ये सुट्ट्यांचा आराखडा देण्यात आला आहे. यात यावर्षी गणेशोत्सवाची सुट्टी 10 दिवसांची देण्यात आली आहे.
गणपती सुट्टी 25 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर असे 10 दिवस राहणार आहे. दिवाळी सुट्टी 18 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर असे एकूण 13 दिवस राहणार आहे. उन्हाळी सुट्टी 2 मे ते 13 जून 2026 अशी 37 दिवस राहणार आहे.
किरकोळ सुट्ट्या 34 दिवस, हिवाळी सुट्टी 13 दिवस, उन्हाळी 37 दिवस असे 84 दिवस सुट्टी राहणार आहे. हिवाळी सुट्टीनंतर 3 नोव्हेंबर 2025 रोजी तर उन्हाळी सुट्टीनंतर 15 जून 2026 रोजी शाळा सुरु होईल असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण लोहार यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नागपंचमी, नारळी पौर्णिमा, स्वातंत्र्यदिन, इद ए मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना, महात्मा गांधी जयंती, विजयादशमी, गुरुनानक जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, नाताळ, मकर संक्रात, प्रजासत्ताक दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, होळी पौर्णिमा, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन या दिन विशेषांना प्रत्येकी एक दिवस सुट्टी जिह्यातील जि. प. च्या प्राथमिक शाळांना राहील. स्थानिक सुट्ट्या 3 दिवस राहणार आहेत. सर्व उर्दू शाळा शुक्रवारी सकाळी 7.20 ते 10.30 या दरम्याने भरणार आहेत. शनिवारी त्या 10.30 ते 5 यावेळेत भरणार आहेत.








