रत्नागिरी :
राज्य सरकारने इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धती राज्यभर राबवण्यास मान्यता दिली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील सर्व क्षेत्रात मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.
अकरावीचे ऑनलाईन प्रवेश मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आदी महानगर पालिका क्षेत्रामध्ये सुरू होते. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयांना हीच प्रक्रिया लागू राहणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेसाठी राज्य स्तरावर पुण्यातील शिक्षण आयुक्तांनी नियंत्रण ठेवावे आणि प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांच्या स्तरावर करण्यात यावी. निविदा प्रक्रिया व अन्य पूर्व तयारी, शिक्षण संचालक, माध्यमिक यांच्या स्तरावर करण्यात यावी.
- चार फेऱ्यानंतर खुले प्रवेश
या प्रवेश प्रक्रियेत नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्यावर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर सर्वांना खुले प्रवेश देण्यात येतील. हे प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर देण्यात येतील. अकरावीमध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होईल, असे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.








