चिपळूण :
पावसाने यावर्षी अपेक्षेपेक्षा लवकर सुरुवात केली असून मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोकणात दमदार हजेरी लावली. या लवकर आलेल्या व सतत पडणाऱ्या पावसामुळे गुहागर, चिपळूण तालुक्यांतील आंबतखोल, कामथे फणसवाडी, मालघर, अडरे, खोपड आणि मोखणे ही महत्त्वाची सहा धरणे मे तसेच जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यातच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत.
दरवर्षी ही धरणे जून, जुलैच्या मध्यावर भरत असत. मात्र यंदा पाटबंधारे विभागाला आधीच धरणांची व्यवस्थापन तयारी करावी लागत आहे. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांची लगबग सुरू झाली असून धरणांमधून योग्य प्रमाणात पाणी सोडण्याची आणि नद्या, कालव्यांच्या पाणी पातळ्यांवर लक्ष ठेवण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. धरणे भरल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामासाठी लागणारे पाणी आधीच उपलब्ध झाल्याने भात लावणीची कामेही लवकर सुरू होईल आणि उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
यावर्षी अचानक जलसाठा वाढल्याने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाण्याच्या प्रवाहाजवळ न जाणे, सांडव्यापासून सुरक्षित अंतर राखणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
- ..अन् धरणं शंभर टक्के भरली
गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर उतारांवरील पाणी थेट धरण क्षेत्रात वाहून येत आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. सद्यस्थितीत गुहागर, आंबतखोल, कामथे फणसवाडी, मालघर, अडरे, खोपड आणि मोरवणे धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. गुहागर धरणात १०७.९५, पिंपर १२६.३७, आंबतखोल १२३.०८, असुर्डे १३७.५९, फणसवाडी ३८.७५, मालघर ३२.१, अडरे १२४.०३, खोपड ११६.०५, मोरवणे ११२.०४ मीटर इतकी पाणीपातळी बुधवारी नोंदवली गेली आहे








