राजकीय कार्यक्रम, उत्सव, विवाह समारंभात फटाक्यांवर बंदी : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या अत्तीबेले येथे फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून मिरवणूक, गणेशोत्सव, विवाह समारंभ आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात येतील. दिवाळीत फक्त ‘ग्रीन क्रॅकर्स’ (हिरवे फटाके) वापरण्यास मुभा आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
अत्तीबेले येथील दुर्घटनेप्रकरणी बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, दिवाळीच्या कालावधीत हिरव्या फटाक्यांचा वापर करण्यास परवानगी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. राजकीय कार्यक्रम, मोठ्या संख्येने लोक सहभागी होणाऱ्या मिरवणुका, गणेशोत्सव आणि विवाह समारंभांमध्ये फटाक्यांचा वापर करू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हिरव्या फटाक्यांचा वापर करता येईल, असे त्यांनी सांगितले.
फटाके फोडण्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे राज्यातही पालन केले जाईल. त्यातही दिवाळी जवळ येत असताना अधिक सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे. यापुढे खासगी कार्यक्रमांमध्ये फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्याची सूचना दिली आहे. धोकादायक फटाक्यांवर संपूर्ण बंदी घातली जाईल, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. बैठकीत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही राजकीय समारंभ आणि विवाह समारंभात सुरक्षेच्या दृष्टीने फटाक्यांच्या वापरावर निर्बंध घालण्याचा सल्ला दिला.
अत्तीबेले येथील दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. तेथील बालाजी क्रॅकर्स दुकानाला आग लागून 14 निष्पाप व्यक्तींचा बळी गेला आहे. कोणत्याही सुरक्षा उपाययोजना नसल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट झाले असून कठोर नियम जारी करण्यास सरसावले आहे. या प्रकरणासंबंधी तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि अग्निशमन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. बेंगळूर जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याची सूचना देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यभरात तपासणी करा!
फटाक्यांच्या दुकानांना परवानगी देताना यापुढे अग्निशमन दल, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुखांनी ठिकाणाची पाहणी करावी. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला तपासणी अहवाल योग्य आहे का, याची पडताळणी करूनच निर्णय घ्यावा. राज्यात सर्वत्र तपासणी करून सुरक्षा उपाययोजना न केलेल्या गोदाम, दुकानांवर कारवाई करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
परवाना वर्षभरापुरताच मर्यादीत
राज्यात 5 वर्षांच्या कालावधीसाठी फटाके दुकानांना दिलेली परवानगी यापुढे वर्षभरापुरतीच मर्यादीत राहणार आहे. कायद्याचे उल्लंघन करून अधिकाऱ्यांनी परवानगी दिली तर अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल. परवाने देण्याआधी स्थळाची प्रत्यक्ष पाहणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येईल.
– डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री
हिरवे फटाके म्हणजे काय?
हिरवे फटाके (ग्रीन व्रॅकर्स) हे दिसायला पारंपरिक फटाक्यांसारखेच आहेत. त्याचा आवाज 30 ते 40 टक्के कमी असतो. प्रदूषणही कमी प्रमाणत होते. हिरव्या फटाक्यांमुळे सामान्य फटाक्यांपेक्षा 40 ते 50 टक्के कमी हानिकारक वायू तयार होतात. ‘सेफ वॉटर रिलीझर’ प्रकारातील फटाके जळाल्यानंतर पाण्याचे कण तयार करतात. त्यात सल्फर आणि नायट्रोजनचे कण विरघळतात. त्यामुळे वायूप्रदूषण कमी प्रमाणात होते. ‘स्टार क्रॅकर’मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट्स वापरतात. अशा प्रकारचा फटाका फोडल्यानंतर सल्फर आणि नायट्रोजन कमी प्रमाणात तयार होतात. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे रसायन वापरले जाते. ‘एसएएफएएल’ प्रकारच्या ग्रीन क्रॅकर्समध्ये अल्युमिनियमचा कमीत कमी वापर केला जातो. त्यात सामान्य फटाक्यांपेक्षा 50 ते 60 टक्के कमी अल्युमिनियम वापरले जाते.
कसे ओळखावेत हिरवे फटाके?
हिरवे फटाके सहज ओळखण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण आणि सीएसआयआरने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. फटाक्यांच्या पॅकेटवर छापलेला बारकोड स्कॅन करूनही अशा फटाक्यांची ओळख पटवणे शक्य आहे. शिवाय फटाक्याच्या प्रत्येक उत्पादनावर सीएसआयआर-नीरीचे चिन्ह दिसेल. हिरव्या रंगाचा बॅचच्या आकारातील कंपनीचे नाव किंवा लोगोही दिसून येईल.









