पुणे / प्रतिनिधी :
पुरूषोत्तम करंडक स्पर्धा म्हणजे महाविद्यालयीन जीवनातील रंगमंचीय आविष्कारांचे सोनेरी पान. मात्र, गेल्या 57 वर्षांच्या स्पर्धेच्या इतिहासात यंदा प्रथमच राज्यातील एकाही महाविद्यालयाला करंडक जाहीर झाला नाही. कोणत्याच महाविद्यालयाची एकांकिका करंडकास पात्र ठरली नसल्याने या करंडकावर त्यांना आपले नाव कोरता आले नाही. त्यामुळे केवळ पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या ‘कलिगमन’ या एकांकिकेला सांघिक क्रमांक देण्यात आला आहे. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामतीच्या ‘भू भू’ एकांकिकेला दुसऱ्या क्रमांकाचा. हरी विनयक करंडक तर मॉडर्न कला शास्त्र आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय शिवाजीनगर या महाविद्यालयाच्या ‘गाभारा’ या एकांकिकेस तिसऱ्या क्रमांकाचा संजीव करंडक जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या पुरूषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (दि.18) आणि रविवारी (दि.18) भरत नाटय़ मंदिरमध्ये पार पडली. प्रत्येक संघाने मोठय़ा मेहनतीने अंतिम फेरीत एकांकिकांचे सादरीकरण केले होते. भरत नाटय़ मंदिरात रविवारी रात्री निकाल जाहीर होणार असल्याने सर्व महाविद्यालयीन संघांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, अंतिम फेरीत दाखल झालेल्या नऊ संघांपैकी एकही संघाची एकांकिका करंडकास पात्र नसल्याचा शेरा परीक्षकांनी दिल्याने एकाही संघाला पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरता आले नाही.
अधिक वाचा : परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्याची स्पर्धा परीक्षार्थींची मागणी
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकुरदेसाई म्हणाले, पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला एक दर्जा आहे. परीक्षकांचे मत आहे, की करंडकासाठी एकही पात्र एकांकिका नाही. त्यामुळे करंडक देऊ नका, सांघिक पारितोषिक द्या. स्पर्धेचा हा नियमही आहे, की जर पात्र एकांकिका नसेल, तर करंडक देण्यात येऊ नये. स्पर्धेच्या 57 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे.








