पाऊस नाही, जनता झाली व्याकुळ : पावसाअभावी बळीराजाची चिंता वाढली
वार्ताहर /किणये
बेळगाव शहरासह तालुक्यात अद्याप मान्सून दाखल झाला नाही यामुळे यंदा खरीप हंगाम साधायचा कसा, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. दि. 8 जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. आज बुधवार दि. 21 मृग नक्षत्राचा शेवटचा दिवस. यंदा मात्र मृग नक्षत्र कोरडे गेले आहे. यामुळे गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच मृग नक्षत्राने हुलकावणी दिली आहे. आता आर्द्रा नक्षत्राकडे नजरा लागल्या आहेत, अशी माहिती जाणकार शेतकऱ्यांनी दिली आहे. तालुक्यातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. बेळगाव तालुक्यात खरीप हंगामात भात, सोयाबीन, भुईमूग, रताळी, बटाटे, नाचणी आदी पिके घेण्यात येतात. या पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी शेतशिवारात मशागतीची कामे करून ठेवली आहेत. शिवारात शेणखत घालण्यात आले आहे. यंदा पावसानेच पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगाम साधायचा कसा, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. तालुक्याच्या काही मोजक्याच शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी केली आहे. तर अजून 90 टक्के भात पेरणीची कामे शिल्लक आहेत. ज्यांनी धूळवाफ पेरणी केली आहे. त्यांच्या शिवारात भात उगवून आले आहे. मात्र पाऊस नसल्यामुळे उगवलेले भात खराब होऊ लागले आहे. ते सुकून जात आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. बहुतांश प्रमाणात अजून भातपेरणी करणे शिल्लक आहे. गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. मात्र पाऊस होत नाही. कधी एकदा पाऊस येईल आणि आपल्या शेतशिवारातील कामाला सुरुवात होईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी लागवड मोठ्याप्रमाणात करण्यात येते. रताळी लागवड अलीकडे बारा महिने करण्यात येऊ लागले आहे. मात्र सर्वाधिक रताळी लागवड ही खरीप हंगामात करण्यात येते. त्यामुळे तालुक्याच्या बेळगुंदी, किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, नावगे, जानेवाडी, वाघवडे, बामनवाडी, बाळगमट्टी, राकसकोप, बिजगर्णी, बेळवट्टी, सोनोली, येळेबैल भागातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेत शिवारामध्ये रोपलागवड करण्यासाठी बांध मेरा (सरी) तयार करून ठेवलेल्या आहेत. हे बांध ट्रॅक्टरच्या सहाय्याने तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी ट्रॅक्टरला प्रती तासाला सहाशे ते साडे सहाशे रुपयेप्रमाणे भाडे देण्यात आले आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. काही ठिकाणी लागवडीसाठी रताळी रोप तयार झालेले आहेत. मात्र पाऊस नसल्याने ही लागवड खोळंबली आहे. मृग नक्षत्राला सुरुवात होऊन मृग नक्षत्राचा शेवटचा दिवस आला तरीही पावसाचा पत्ता नाही. यामुळे अनेक गावांमध्ये कूपनलिका, विहिरीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. बऱ्याच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. दोन-चार दिवसात पाऊस न झाल्यास पाण्यासाठी नागरिकांचे बरेच हाल होणार आहेत. पावसाअभावी यंदा खरीप हंगामाचे शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे. हवामान खात्याने काही दिवसापूर्वीच पाऊस दाखल होणार, असा अंदाज वर्तविला होता. मात्र हवामान खात्याचा अंदाजही बेळगाव परिसरात फोल ठरला असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. तालुक्यात ऊसपीक मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे. पावसाअभावी बऱ्याच शेत शिवारातील ऊसपीक वाळून, सुकुन जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
केवळ पावसावरच सर्व अवलंबून
निसर्गाचे चक्र अलीकडे बदलू लागले आहे. हवामानात दिवसेंदिवस कमालीचा बदल दिसून येत आहे. आमच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पाऊस येत नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पाऊस नाही तर मग विविध बियाणांची पेरणी करायची कशी, असा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित झाला आहे. नदी-नाले कोरडे पडलेले आहेत. तसेच कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना केवळ आणि केवळ पावसावरच अवलंबून राहावे लागले आहे. त्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या नजरा वरूणराजाच्या आगमनाकडे लागून राहिलेल्या आहेत.
– अरुण गुरव, शेतकरी









