पोलीस प्रशासन, महानगरपालिका, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी
महापूर आणि कोरोना यामुळे गेल्या 3 वर्षापासून गणेशोत्सव निर्बंधमुक्त होत आहे. गतवर्षी महाद्वाररोडचा पारंपारिक मार्ग मिरवणुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. यंदा मात्र हा मार्ग खुला करण्यात येणार आहे. मात्र तरुण मंडळांनी आवाज मर्यादेचे भान राखून यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात, उत्साहात साजरा करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.
शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक सोमवारी सायंकाळी शाहू स्मारक भवन येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे प्रमुख उपस्थित होत्या. बैठकीच्या सुरुवातीस मंडळांच्या प्रमुखांनी आपली भूमिका मांडली, पोलीस व महापालिकेकडून सहकार्य असावे अशी भुमिका मांडली.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, आवाज मर्यादेबाबत उच्च न्यायलयाने निर्देश दिले आहेत. याचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. ज्येष्ठ व्यक्ती, लाहन मुले आणि विद्यार्थी यांचा विचार करून आवाजाची पातळी वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. ही पातळी वाढल्यास कारवाई होणार याचेही भान सर्वांनी ठेवावे. उत्सव काळात पोलिस प्रशासनाकडून समन्वयाने आणि विश्वासाने मार्ग काढण्याचे प्रयत्न केला जाईल. उत्सव काळात अक्षेपार्ह पोटर लावू नका असे सांगितले.
आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, प्रत्येक वॉर्डात विसर्जन कुंड ठेवले जाणार आहे. ईराणी खणीत विसर्जनाचे अधिक चांगले नियोजन केले जाईल. रस्त्यावरील खड्डे, विद्युत व्यवस्था आणि झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, मिरवणूक मार्गावरील पॅचवर्कचे काम 25 ऑगस्ट पूर्वी पूर्ण केले जाईल. साडेचार हजाराहून अधिक ठिकाणी विद्युत सुविधा उपलब्ध केली जाईल.
यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, बाबा पार्टे, महेश जाधव, गणी आजरेकर, धनंजय सावंत, सरलाताई पाटील यांच्यासह मंहळांचे पदाधिकारी हजर होते. करवीरचे उपअधीक्षक संकेत गोसावी, गृहपोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे निरीक्षक संजय गोर्ले, दत्तात्रय नाळे, संतोष जाधव, राजेश गवळी, करवीरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे आदी हजर होते.
मंडळांच्या सुचना
नियमांच्या चौकटीत अडकू नका,
परवानगीसाठी एक खिडकी ठेवा,
मिरवणूकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करा.
पंचगंगा नदीत विसर्जनास परवानगी द्यावी.
मूर्ती दान केल्यानंतर ती दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी
25 ऑगस्ट पर्यंत रस्त्याचे पॅचवर्क करा
स्वागत कक्षाबाबत भुमिका स्पष्ट करा
बैठकीतील निर्णय…
महाद्वाररोड ते पापाची तिकटी हा मिरवणूक मार्ग खुला
पोलिस मित्रांची नेमणूक करून ओळखपत्रे वाटप
दक्षता समिती स्थापन होणार
महिलांच्या सुरक्षीतेतेबाबत ठोस उपाययोजना
गणराया ऍवॉर्ड सुरू होणार