हेस्कॉमच्या महसुलात वाढ
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा झाला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हेस्कॉमने विद्युत कनेक्शनसाठी टेम्पररी मीटरची सक्ती केली होती. शहरातील 265 हून अधिक मंडळांनी टेम्पररी विद्युत मीटर घेतले होते. गणेशोत्सवामुळे हेस्कॉमच्याही महसुलात टेम्पररी मीटरमुळे वाढ झाली आहे.
यावर्षी दहा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रत्येक मंडळाला हेस्कॉमने टेम्पररी विद्युत कनेक्शन दिले होते. मंडळांना विद्युत रोषणाईसह स्पीकर व इतर विद्युत उपकरणे लावण्यासाठी वीज गरजेची होती. एक खिडकी योजनेतून मंडळांना विद्युत कनेक्शन देण्यात आले. बेळगाव शहरात 370 हून अधिक गणेशोत्सव मंडळे असली तरी यापैकी काही मंदिरांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करत असल्याने विद्युत कनेक्शन घेतले जात नाही.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी विद्युत कनेक्शन घेणाऱ्या मंडळांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. गणेशोत्सव संपल्यानंतर हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी मीटर रिडिंग घेऊन मीटर ताब्यात घेतले. आता मीटर रिडिंगप्रमाणे विद्युतबिले दिली जाणार असून मंडळांना ते भरावे लागणार आहे.









