कोल्हापूर / संतोष पाटील :
युरोपियन हवामान संस्था ‘कोपर्निकस‘च्या अहवालानुसार मागील वर्ष हे सर्वाधिक उष्णतेचं ठरले. सरासरी पारा दीड अंशाने वाढला होता. यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरणार नाही. कोल्हापूरचे मार्च अखेर, एप्रिल आणि मे दरम्यान सरासरी तापमानात मागील वर्षीपेक्षा दोन अंशांनी वाढ राहणार आहे. उन्हाचा तडका अर्थात सनस्ट्रोकपासून बचाव हाच उपाय आहे. मला काय होतंय, हा कोल्हापुरी बाणा बाजूला ठेवूनच उन्हापासून बचाव करण्याची गरज आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे मागील वर्षीपेक्षा आताचे वर्ष उष्ण वाटत आहे. 2022 पासून दरवर्षी सरासरी तापमानात वाढ होत आहे. 2024 हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष मानले जाते. याचा अर्थ 2025 मध्ये वातावरणात अजून सकारात्मक बदल होईल, असे नाही. मागील वर्षी इतकेच सरासरी तापमान किंवा त्यापेक्षा किंचित जादाच उष्ण ठरण्याची शक्यता आहे. याची आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात झलक दिसत आहे.
युरोपियन महासंघाच्या हवामान विभागाच्या अहवालानुसार 2023 मध्ये 1.14 अंशांनी तापमान वाढले. 2024 मध्ये जमीन आणि समुद्राचे तापमान सरासरी 1.35 अंशांनी वाढले. याचा अर्थ दोन वर्षात तापमान साधारण 2.5 अंशांनी वाढले आहे. कोल्हापूरचे सरासरी तापमान गेल्यावर्षी 35.55 अंशावरुन 37.11 अंशावर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मार्चतील दुसरा आठवडा हॉट ठरणार आहे. कोल्हापूरचा पारा 36 अंशावरुन थेट 41.5 अंशापर्यंत जाणार आहे. 1 मार्चपासून सलग तापमानात होणारी वाढ अंगाची काहिली करणारी असेल.
मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवू लागला आहे. हवामानातील बदल त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. जसजशी उष्णता वाढेल, तशी उष्माघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ताप–कणकणी, सर्दी आणि खोकल्यासारख्या हंगामी आजाराने त्रस्त रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होऊ शकते. थोडेसे दुर्लक्ष आणि निष्काळजीपणामुळे उष्माघात होऊ शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम देखील होऊ शकतात. चार दिवसांपासून अचानक हवामानाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. सकाळी आठ वाजल्यापासूनच सूर्य तळपत आहे. सकाळी 10 वाजल्यापासून गरम झळा बसत आहेत. उष्णतेच्या झोताने दिवसभर हैराण केले आहे. मार्चच्या सुरूवातीलाच दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. गतवर्षी मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान तापमान सरासरी दीड अंश सेल्सिअसने अधिक होते. यंदा यात वाढच होण्याचे संकेत आहेत.
- मार्च महिना घाम काढणार
मार्चच्या सुरूवातीपासूनच कोल्हापूरचे कमाल 36.11 आणि किमान 18.33 अंश सेल्सियस असणाऱ्या तापमानात रोज वाढ होताना दिसेल. शनिवार ते सोमवारपर्यंत सरासरी तापमानात एक अंशाची वाढ होईल. पारा 36 अंशावरुन 37 अंशावर जाईल. त्यानंतर पुढील आठवडाभर कोल्हापूरचे तापमान 40 अंशाच्या पुढे जाणार आहे. गुरूवारी 40.5 अंशावरुन त्यानंतर 41.66 पर्यंत पारा जाणार आहे. एरवी एप्रिल मे महिन्यात कडक उन्हाळ्यात घ्यावी लागणारी काळजी यंदा मार्चपासून घ्यावी लागणार आहे.
- सनस्ट्रोकची लक्षणे अन् बचाव हाच उपाय
चक्कर येणे, अस्वस्थता, उलट्या होणे, तीव्र डोकेदुखी, जास्त तहान, लघवी कमी होणेजलद श्वास आणि हृदय हृदयाचे ठोके वाढणे. माणसाचे सामान्य तापमान 36.4 ते 37.4 अंश सेल्सिअस असावे. तेजस्वी सूर्यप्रकाश किंवा अतिशय उष्ण वातावरणात राहिल्याने उष्णतेचा ताण येतो, ज्यामुळे उष्णतेशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. हे रोग सौम्य ते गंभीर असू शकतात, ज्यात पायांना सूज, स्नायूंवर पुरळ, दातांमध्ये पेटके येणे, मूर्च्छा, अशक्तपणा यांचा समावेश होतो. डार्ट स्ट्रोकमुळे मूत्रपिंडाशी संबंधित आजारांसारखे अनेक आजार देखील होऊ शकतात. तहान लागण्याची वाट पाहू नका, त्याऐवजी जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या. लिंबू पाणी, ताक यासारखी घरगुती पेये घ्या. उष्माघातापासून बचाव हाच उपाय आहे. थकवा जाणवल्यास तत्काळ वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्या.
डॉ. शैलेश उर्फ राजू सावंत, जनरल फिजिशयन
- एसीमधून थेट सूर्यप्रकाशात येऊ नका
कडक ऊन आणि उष्णतेची लाट लक्षात घेऊन दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत काही अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. घरातून बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा. एसीच्या बाहेर थेट सूर्यप्रकाशात जाऊ नका. दुपारच्या उन्हात कष्टाची कामे करु नका. दुपारी स्वयंपाक करताना स्वयंपाकघराचा दरवाजा आणि खिडकी उघडा.पांढ्रया आणि हलक्या रंगाच्या कपड्यांनी अंग झाकून डी बाहेर आला. सूर्यप्रकाशापासून स्वत?चे रक्षण करण्यासाठी तुम्ही पातळ, सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे घालावेत. थेट सूर्यप्रकाशात बाहेर जाण्यापूर्वी आपले डोके झाकून घ्या. उन्हापासून डोक्याचे संरक्षण करण्यासाठी छत्री, टोपी, टोप्या, रुमाल किंवा इतर पारंपारिक टोपी वापरा.
- कोल्हापूरचे तापमान दृष्टीक्षेप (अंश सेल्सियसमध्ये)
कमाल किमान
अंदाज 37.11 18.33
सरासरी 31.11 20.55
गेल्यावर्षी 35.55 22.22








