भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावोत्कट उद्गार, काँग्रेसवर घणाघात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हरियाणात केलेली विजयाची हॅटट्रिक आणि जम्मू-काश्मीरमध्ये मिळविलेले समाधानकारक यश हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षावधी कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. हा विजय त्यांनाच समर्पित आहे. मी हरियाणातील आणि जम्मू-काश्मीरमधील मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा मन:पूर्वक आभारी आहे, असे भावोत्कट उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांच्या मतगणनेनंतर ते येथील पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांसमोर विजयोत्सवाच्या निमित्त भाषण करीत होते.
आपल्या भाषणात त्यांनी या दोन्ही प्रदेशांमधील जनतेची प्रशंसा केली. हरियाणातील जनतेने असत्य अपप्रचाराच्या जाळ्यात न अडकता विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. भारतीय जनता पक्षावर या जनतेने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करुन आम्हाला राज्याला चहुमुखी विकास करण्याची संधी दिली आहे. हरियाणात गेल्या 13 निवडणुकांमध्ये 10 वेळा दर पाच वर्षांनी सरकारमध्ये परिवर्तन झाले आहे. तथापि, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, की ज्याने या राज्यात विजयाची हॅटट्रिक करुन दाखविली आहे. हे श्रेय जसे आमच्या प्रशासनाचे आहे, तसे उत्कट सहकार्य करणाऱ्या जनतेचे आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला असे प्रतिपादन त्यांनी केले.
काँग्रेसवर घणाघात
आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठविली. काँग्रेसला अनेक पराभवांना तोंड द्यावे लागले असूनही त्या पक्षाचा अहंकार कमी झालेला नाही. एकेकाळी हा पक्ष प्रचार न करताही सत्ता मिळवत होता. आजही तो त्याच धुंदीत आहे. मात्र, जनता या पक्षाला वैतागली असून एकदा या पक्षाने एखादे राज्य गमावले की पुन्हा तो त्या राज्यात विजयी होऊ शकत नाही असा अनुभव अनेक राज्यांमध्ये आलेला आहे. केँग्रेसला आपल्या मर्यादांची जाणीव नाही. त्यामुळे हा पक्ष निवडणुकीत पराभव झाला की, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या नावाने खडे फोडतो. केंद्रीय निवडणूक आयोगावर तोंडसुख घेतो. हे हास्यास्पद आहे, अशी कठोर टीका त्यांनी केली.
विकासाच्या मार्गावर अग्रेसर राहणार
हरियाणातील विजयामुळे आणि जम्मू-काश्मीरमधील कामगिरीमुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. आम्ही आता अधिक जोमाने आणि वेगाने विकासाच्या मार्गावर धावणार आहोत. आता आम्हाला कोणी रोखू शकत नाही. विरोधी पक्षांचे विकासविरोधी डावपेच आता जनतेच्या चांगलेच लक्षात आले असून जनता अशा विरोधी पक्षांना कधीही थारा देणार नाही. जनतेला आता केवळ विकास हवा असून आम्ही ही अपेक्षा पूर्ण करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









