राज्य पोलीस महासंचालकांची सूचना स्वागतार्ह; तरी प्रत्यक्ष कृतीवर भर दिल्यास परिणाम निश्चितपणे शक्य
प्रतिनिधी/ बेळगाव
‘सर्वसामान्यांशी सौजन्याने वागा, अशी सूचना राज्य पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीसप्रमुखांना केली असून तसे लेखीपत्र त्यांनी पाठविले आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांना आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना अशी सूचना करावी लागते याचाच अर्थ पोलीस जनतेशी सौजन्याने वागत नाहीत, असाच होतो.
पोलीस स्थानकामध्ये येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागण्याची ही सूचना कार्यान्वित होण्याबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे. मुळात बेळगावकरांना तर नेहमी उलटाच अनुभव आलेला आहे. तक्रारदार ज्या भाषेत तक्रार सांगतो ती ऐकून तक्रार दाखल करणे बंधनकारक आहे. परंतु बेळगावमध्ये प्रथम कन्नडमध्ये बोला, असे उद्धटपणे दटावले जाते. त्यामुळे बिगरकानडी भाषिकांच्या तक्रारी नोंदवून घेण्यात नेहमीच अडचण येते.
कार्यालयातच नव्हे तर इतरत्र सुद्धा सर्वसामान्यांशी पोलीस आणि अन्य अनेक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सौजन्यानेच वागावे अशी अपेक्षा असते. परंतु वाळवंटात मृगजळ दिसावे त्याप्रमाणे सौजन्याने वागणारे अधिकारी व पोलीस विरळाच. दटावणे, धमकावणे, उद्धटपणे बोलणे हे आपले अधिकारच आहेत, अशाच थाटात बरेचसे पोलीस वावरत असतात. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवेळी तरी वाहनचालक म्हणजे आपले खासगी हाताखालचे कर्मचारीच समजून पोलीस येता जाता हटकत असतात.
कोणत्याही बंदोबस्तावेळी, आंदोलनावेळी पोलीस निष्कारण सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारतात. कोणतीही पूर्वकल्पना न देता रस्ते अडवणे यामध्ये बेळगावच्या पोलीस दलाचा हात कोणी धरणार नाही. पूर्वकल्पना न देता रस्ते अडविल्यानंतर रुग्णांचे किती हाल होतात याची कल्पना अधिकाऱ्यांना नसावी का? शिवाय रुग्ण, डॉक्टर आणि प्रामुख्याने पत्रकार सर्व माध्यम प्रतिनिधी वृत्तांकन करण्यासाठी घटनास्थळी पोहोचत असताना त्यांनासुद्धा अटकाव केला जातो आणि ओळखपत्र दाखविल्यानंतरही उद्धट भाषेत वादावादी करून माघारी पाठविले जाते.
राज्य महासंचालकांनी केलेल्या सूचनेचे स्वागतच करायला हवे. आपल्या खात्यातील पोलीस अधिकारी सौजन्याने वागत नाहीत, याचा अनुभव तरी त्यांना आला असावा अथवा त्यांची खात्री असावी. परंतु केवळ सूचना करून चित्र बदलणार नाही. आपले बोलणे हे उद्धटपणाचे आहे हे अनेकदा पोलिसांच्या लक्षातच येत नाही. कारण तसे त्यांचे समुपदेशन (कौन्सिलिंग), संवेदनशीलकरण (सेन्सेटायझेशन) झालेले नसते. मुळात अशा पद्धतीचे समुपदेशन व त्यासाठी कार्यशाळांचे आयोजन आवश्यक आहे. त्यामुळे सूचना स्वागतार्ह असली तरी प्रत्यक्ष कृतीवर भर दिल्यास त्याचा परिणाम निश्चितपणे दिसून येईल.









