एकनाथ शिंदे- भाजप युतीला मोठा दिलासा देताना, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अविश्वास ठरावाला सामोरे जावे न लागल्यामुळे राज्यात पूर्वीचे महाविकास आघाडी सरकार पुनर्स्थापित करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या इच्छेने राजीनामा दिला असल्याचा निर्णय देताना,
सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नाबाम राबियाच्या निकालाचा संदर्भ देऊन 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असल्यास तो निर्णय देण्याच्या अधिकार अध्य़क्षांना देण्यात आला आहे. सरन्यायाधीशांच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत बोलताना देवेद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर समाधानी आहोत, कालपासून काही अतीउत्साही आणि उड्या मारणारे अनेकजण अपयशी ठरले आहेत. जे लोक सरकार पडणार अशी चर्चा करत होते, त्यांचे दावे आणि चर्चा फोल ठरल्या आहेत. आम्ही कोर्टाच्या ऑर्डरवर समाधानी आहोत. हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे.”
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सुप्रिम कोर्टाच्या आदेशातील महत्त्वाचे मुद्दे मांडून विरोधकांवर टिका केली. ते म्हणाले “महाविकास आघाडीच्य़ा योजना फसल्या आहेत, सुप्रिम कोर्ट पूर्वस्थिती आणणार नसल्याने उद्धव ठाकरेंचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले आहे.”
अपात्रतेचे सर्व अधिकार अध्य़क्षांना दिले असल्याने स्पीकरच्या अधिकारांवर निर्णय घेण्यासाठी कोणताही असाधारण परिणाम होणार नाहीत. तसेच सर्व आमदारांना त्यांच्या प्रलंबित याचिकांची पर्वा न करता सभागृहात सहभागी होण्याचा अधिकार आहे” असेही ते म्हणाले








