सीबीआयने वानखेडे यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्या संबंधीत इतर मालमत्तांवर छापे टाकल्यानंतर आपल्य़ाला देशभक्तीची शिक्षा दिली जात असल्याचे म्हटले आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला कायद्याच्या कचाटीतून सोडवण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप समीर वानखेडेवर सीबीआयने ठेवला आहे. आर्यन खान ड्रग्ज- ऑन- क्रूझ प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने समीर वानखेडे यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
एक निवेदन जाहीर करून समीर वानखेडे यांनी सीबीआयवर आरोप केला आहे. आपली पत्नी आणि मुलांसमोर त्यांच्यासह इतर सदस्यांचा १२ तासांपेक्षा जास्त काळ चौकशी करण्यात आली. ते म्हणाले, “त्यांच्याकडे ₹ 23 हजार आणि चार जंगम मालमत्तांची कागदपत्रे सापडली आहेत. मी सेवेत रुजू होण्यापूर्वीच ही मालमत्ता मिळवली होती. मी देशभक्त असल्याबद्दल मला ही सर्व बक्षीस मिळत आहे,” असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. आपली पत्नी क्रांती रेडेकर हिचा फोनही सीबीआय अधिकाऱ्यांनी काढून घेतला असल्याचेही वानखेडे यांनी म्हटले आहे.
आपल्या छाप्यात सीबीआयने समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांच्या घरातून 28 हजार रुपये आणि वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या घरातून 28 हजार रुपये जप्त केले आहेत.
2008- बॅचचे आयआरएस अधिकारी, समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह इतरांनाही अटक केले होते. आर्यन खानने सलग 25 दिवस तुरुंगात काढल्यावर एनसीबीने आपल्या आरोपपत्रात आर्यन खानला क्लीन चिट दिली होती. हा क्लिन चीट देताना आर्यन खानजवळ कोणतेही ड्रग्ज आढळले नसल्याचे म्हटले होते.








