शिल्पकार डॉ. अरुण योगीराज यांचे सत्कारप्रसंगी प्रतिपादन
बेळगाव : शिरसंगी येथील विश्वकर्मा समाजाची कुलदेवता श्री काळिकादेवीचा पारंपरिक गुढीपाडवा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अयोध्येतील श्ा़dरीराम मंदिरात असलेली बालरामाची मूर्ती घडविणारे शिल्पकार डॉ. अरुण योगीराज यांना विश्वकर्मा समाज विकास संस्थेच्यावतीने विश्वकर्मा शिल्पकला रत्नभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. विश्वकर्मा समाज विकास संस्था, विश्वकर्मा प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार जगदीश शेट्टर उपस्थित होते. अन्य समाजांच्या विकासासाठी झटत असलेला एकमेव विश्वासार्ह समाज म्हणजे विश्वकर्मा समाज आहे, अशा शब्दात त्यांनी समाजाचे कौतुक केले. कै. सुरेश अंगडी हे काळिकादेवीचे परमभक्त होते. आपण प्रसिद्ध मंदिराच्या विकासासाठी झटणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार जगदीश शेट्टर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विश्वकर्मा शिल्पकला रत्नभूषण पुरस्कार स्वीकारून डॉ. अरुण योगीराज म्हणाले, इतर देवदेवतांबरोबरच आपली कुलदेवता काळिकादेवीचा आशीर्वादही या पुरस्काराच्या रूपाने आपल्याला मिळाला आहे. ही आपली पूर्वजन्माची पुण्याई आहे. आपले आजोबा व वडिलांच्या प्रेरणेने शिल्पकला क्षेत्रात आपण प्रवेश केला. पुढच्या पिढीसाठीही या कलेचे जतन केले पाहिजे, संस्कृती टिकवून ती वाढवली पाहिजे. कोणत्याही अपेक्षेशिवाय केलेल्या कामामुळे प्रसन्नता प्राप्त होते. विश्वकर्मा समाजात आपला जन्म झाला हीसुद्धा आपली पुण्याईच आहे.
यावेळी विविध ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. देवीला पंचामृत अभिषेक, कानिका समर्पण दर्शन आदी धार्मिक कार्यक्रमही करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रो. पी. बी. बडीगेर होते. अरेमादनहळ्ळी सूज्ञान पीठाचे अनंतश्री विभूषित शिवसूज्ञानतीर्थ स्वामीजी यांच्या सानिध्यात हे कार्यक्रम झाले. यावेळी हंपी कन्नड विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. वीरेश बडीगेर, चिकुंबी अभिनव नागलिंग स्वामीजी, काळिका देवस्थानचे तेजप्पाचार्य मोकी, हुबळी-धारवाडचे महापौर रामण्णा बडीगेर, म्हैसूर येथील सिद्धाप्पाजी, डॉ. पवित्रा आचार्य, डॉ. नागराज आचार्य, विनायक आचार्य, राजेश, गजानन सुतार, सुरेश पत्तार, किरण पत्तार आदी उपस्थित होते.









