ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाच्या या कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर तिखट शब्दात प्रतिक्रीया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल!”
कर्नाटकच्या कोलारमध्ये मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? असे वक्तव्य राहुल गांधीनी प्रचारादरम्यान केलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना जामीनही दिला होता. तसेच उच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.








